Life in Pune is regular; Appeal to police not to believe in rumors | पुण्यात जनजीवन सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

ठळक मुद्देशहरातील अनेक शाळा आज बंद, महत्त्वाच्या चौकांत पोलीस बंदोबस्तस्वारगेट बसस्थानकाचा परिसर आज मात्र शांत

पुणे : भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील जनजीवन सुरळीत व शांततेत आहे.
शहरातील अनेक शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. कात्रज, बिबवेवाडी सहकारनगरमधील शाळा बंद आहेत. बहुतांशी ठिकाणची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पोलिसांनी शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर पुणेकरांनीही त्यास प्रतिसाद देत शांतता राखण्यास प्राध्यान्य दिल्याचे शहरातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. महत्त्वाच्या चौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीएमपीने आज आपली सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बंदमुळे प्रवाशांची संभाव्य गैरसोय टळण्यास मदत झाली आहे. नेहमीच गजबज असणारा स्वारगेट बसस्थानकाचा परिसर आज मात्र शांत दिसत होता.  
महत्त्वाच्या सेवा यामध्ये रुग्णालये, बँका सुरू असून कामकाज सुरळीत असल्याचे समजते. शांततेत लाँग मार्च काढणार असल्याचे महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी आघाडी, जातीअंत परिषद, भारिप बहुजन महासंघ, भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभिमान समिती पुणे, शनिवारवाडा एल्गार परिषद पुणे, पुणे शहर जिल्हातील सर्व पुरोगामी पक्ष-संघटना आदी संघटनांतर्फे सांगण्यात आले आहे.