पुण्यातील भाजपचे सत्ताकेद्र कोथरूडला, अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:46 AM2024-03-15T10:46:42+5:302024-03-15T10:47:00+5:30

अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही? असा सवाल उपस्थित करीत भाजपचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत....

Kothrud, the seat of BJP in Pune, why is there no representation in other parts? | पुण्यातील भाजपचे सत्ताकेद्र कोथरूडला, अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही?

पुण्यातील भाजपचे सत्ताकेद्र कोथरूडला, अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही?

पुणे : पुणे लोकसभा मतदरसंघासाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्षपद, राज्याचे मंत्रिपद, राज्यसभेची खासदारकी, भाजपचे राज्याचे सरचिटणीसपद ही सर्व पदे कोथरूडमध्येच दिली आहेत. त्यामुळे भाजपचे सत्ताकेंद्र कोथरूड झाले आहे. त्यामुळे अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही? असा सवाल उपस्थित करीत भाजपचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कोथरूडमध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. कोथरूडचे प्रतिनिधत्व करणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रिपद आहे. विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून तिकीट कापण्यात आलेल्या डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची खासदारकी देऊन राजकीय पुनर्वसन केले आहे. त्यातच पुणे लोकसभा मतदरसंघासाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मुरलीधर मोहोळ हे कोथरूडमधीलच आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर स्थायी समिती आणि महापौरपद मोहोळ यांना एकाच टर्ममध्ये मिळाले आहे. मोहोळ यांच्याकडे भाजपचे राज्याचे सरचिटणीसपद आहे. त्यामुळे भाजपचे सत्ताकेंद्र कोथरूड झाले आहे. अन्य भागाला प्रतिनिधित्व मिळत नाही, याबद्दल कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.

भाजपचे कार्यालयही कोथरूडला

भाजपचे सुरुवातीचे पक्ष कार्यालय तांबडी जोगेश्वरीजवळ होते. अनेक वर्षे याच शहर कार्यालयातून पक्षाचा कारभार होत होता. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या भाजपच्या पक्ष कार्यालयाची जागा कमी पडत असल्याचे कारण देत हे कार्यालय शिवाजीनगरमध्ये नेण्यात आले. त्यानंतर आता कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या डीपी रोडवर भाजपचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा कोथरूडने घेतली आहे.

Web Title: Kothrud, the seat of BJP in Pune, why is there no representation in other parts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.