केळकर संग्रहालयातील अमूल्य ठेवा जागेअभावी पेटीबंद; प्रतीक्षा बावधनमधील संग्रहालय नगरीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:42 PM2018-01-17T17:42:21+5:302018-01-17T17:48:49+5:30

जागेअभावी कलावैभवाचे दर्शन घडवणारा अमूल्य ठेवा राजा दिनकर केळकर संग्रहालयात पेटीबंद करुन ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाकडे असणाऱ्या वस्तूंपैकी केवळ १२ टक्केच वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

Kelkar museum keeps asset in Box due to space shortage; waiting for Bavdhan museum | केळकर संग्रहालयातील अमूल्य ठेवा जागेअभावी पेटीबंद; प्रतीक्षा बावधनमधील संग्रहालय नगरीची

केळकर संग्रहालयातील अमूल्य ठेवा जागेअभावी पेटीबंद; प्रतीक्षा बावधनमधील संग्रहालय नगरीची

Next
ठळक मुद्देशुक्रवार पेठेमध्ये चार मजली इमारतीत आठ दालनांमध्ये वसले आहे संग्रहालयमध्यवस्तीत असल्याने पार्किंग, अरुंद रस्ता आदी समस्यांमुळे संग्रहालयाच्या उत्पन्नावर परिणाम

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक वैभवात मानाचा तुरा खोवणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे भूषण ठरले आहे. पुरातन भांडी, चूल, वस्त्रे, पंचारत्या, लामण दिवे, मुघल दिवे, शस्त्रे, रंगीत काचचित्रे, मूर्ती यातून संस्कृतीच्या पाऊलखुणा जपल्या जात आहेत. मात्र, जागेअभावी कलावैभवाचे दर्शन घडवणारा अमूल्य ठेवा संग्रहालयात पेटीबंद करुन ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाकडे असणाऱ्या वस्तूंपैकी केवळ १२ टक्केच वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या असून, इतर वस्तू पेट्यांमध्ये, स्टोअरेज वॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने देऊ केलेल्या सहा एकर जागेत संग्रहालय नगरी अवतरणार आहे. राजकीय इच्छाशक्तीला बळकटी मिळाल्यास पेटीबंद असलेला समृध्द वारसा पर्यटक, अभ्यासक, संशोधकांसाठी मेजवानीच ठरेल.
शुक्रवार पेठेमध्ये चार मजली इमारतीत आठ दालनांमध्ये संग्रहालय वसलेले असून, २२,००० वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत. सध्या २० हजार स्क्वेअर फूट जागेत वसलेल्या संग्रहालयातील जागा कमी पडत असल्याने अनेक दुर्मीळ वस्तू पेटीबंद करुन ठेवलेल्या आहेत. संग्रहालयाकडे असणाऱ्या ठेव्यापैकी बारा ते साडेबारा टक्के वस्तू येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. इतर वस्तू संग्रहालयातच जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शित वस्तूंच्या काचेच्या पेट्यांखालील स्टोअरेजमध्ये या वस्तू ठेवलेल्या आहेत. या ऐतिहासिक ठेव्याचा आनंद पर्यटक, संशोधक, अभ्यास आणि विद्यार्थ्यांना लुटता यावा, यासाठी संग्रहालय नगरी उभारण्यासाठी संग्रहालयाचे व्यवस्थापन मंडळ प्रयत्नशील आहे. राज्य शासनाकडून बावधन येथील सहा एकर जागा मिळाली आहे. त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. केंद्र आणि राज्य सरकार, पुणे महानगरपालिका यांच्याकडून वेगाने हालचाली झाल्यास संग्रहालय नगरीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असा आशावाद राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
संग्रहालयात प्रदर्शित न करण्यात आलेल्या समृध्द वारशामध्ये दैनंदिन जीवनातील वस्तू, संगीत वाद्ये, हस्तीदंत, देव्हारे, मूर्ती, कोरीव नक्षीकाम असलेले दरवाजे, अशा अनेक दूर्मीळ वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये हस्तिदंत, पुरातन काळातील देव-देवतांच्या मूर्ती, प्राणी दिवे, पक्षी दिवे, पंचारत्या, समया, लामण दिवे, मुखवटे, डब्या, घरगुती वापरातील वस्तू आदी वस्तू जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंची येथील कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे देखभाल आणि साफसफाई केली जाते.


डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांनी हे संग्रहालय उभारण्यासाठी हयातीतील ७० वर्षे वेचली. त्यांना सुरुवातीपासून ऐतिहासिक वस्तू, संदर्भ यांचा अभ्यास करण्याचा छंद होता. कवी अज्ञातवासी या नावाने ते कविता लिहित असत. इतिहासातील उल्लेख, संदर्भ सांगणा-या वस्तूंचा संग्रह करावा, अशी कल्पना १९२० च्या सुमारास त्यांना सुचली. त्यानुसार त्यांनी संग्रह करण्यास सुरुवात केली आणि १९३०-३२ च्या सुमारास त्याला संग्रहालयाचे स्वरुप आले. राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाल्याने संग्रहालयाची किर्ती देशभरात पोचू लागली. डॉ. दिनकर केळकर यांच्या मुलाचे राजा केळकर यांचे वयाच्या १० व्या वर्षीच निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संग्रहालयाचे राजा दिनकर केळकर असे नामकरण करण्यात आले.

डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांनी भारतभर फिरुन जमवलेल्या वस्तूंपैकी मोजकाच ठेवा जागेअभावी संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेला आहे. राजकीय इच्छाशक्तीचा पाठिंबा मिळाल्यास बावधन येथील संग्रहालय नगरीचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक वारसा जपला जाणार आहे. १९८१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संग्रहालयास भेट दिली होती आणि त्यानंतर संग्रहालयाचा विस्तार झाला. त्यानंतर आजतागायत या जागेमध्ये संग्रहालय उभे आहेत. मात्र, मध्यवस्तीत असल्याने पार्किंग, रहदारी, अरुंद रस्ता आदी समस्यांमुळे संग्रहालयाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
- सुधन्वा रानडे, संचालक, राजा दिनकर केळकर संग्रहालय

Web Title: Kelkar museum keeps asset in Box due to space shortage; waiting for Bavdhan museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.