कार्तिकी सोहळ्याला सुरुवात अन् आळंदी बंद; बेताल वक्तव्याचा शहरात निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:25 PM2023-12-05T13:25:23+5:302023-12-05T13:25:58+5:30

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय? असे वक्तव्य केले

Kartiki celebrations begin and end; A protest march in the city against the absurd statement | कार्तिकी सोहळ्याला सुरुवात अन् आळंदी बंद; बेताल वक्तव्याचा शहरात निषेध मोर्चा

कार्तिकी सोहळ्याला सुरुवात अन् आळंदी बंद; बेताल वक्तव्याचा शहरात निषेध मोर्चा

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी यात्रेला आज (दि.५) प्रारंभ झाला. मात्र सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी आळंदी ग्रामस्थांनी विश्वस्त निवड व विद्यमान प्रमुख विश्वस्तांनी आळंदीकरांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहरातून मोर्चा काढला. विशेषतः दोन्ही मुद्यांसाठी आळंदीत बंद पाळून निषेध सभा घेण्यात आली.
           
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आळंदीतील ग्रामस्थांना विश्वस्त म्हणून डावलल्याबद्दल मंगळवारी (दि.५) आळंदी बंदची हाक समस्त आळंदीकरांनी दिली होती. दरम्यान देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय? असे वक्तव्य केले. त्यामुळे या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांकडून घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.

माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निषेध सभेत ग्रामस्थ, वारकरी मंडळी सहभागी झाले होते. चाकण चौकातून निषेध मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. प्रदक्षिणा मार्गे निघालेला मोर्चा महाद्वारासमोर थांबला. यावेळी माजी नगरसेवक डी डी भोसले म्हणाले, आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय असे विचारण्यापेक्षा आपलेच योगदान काय? हे स्पष्ट करा. विशेषतः देवस्थानचा हिशोब दिला जात नाही. इतर देवस्थानच्या तुलनेत आळंदीचा विकास झाला नाही. देवस्थानच्या साडेचारशे एकर गायरान जागेत काय विकास केला ते स्पष्ट करा. देवस्थान आळंदीकरांच्या बापदादांचे आहे. मात्र असे असतानाही स्थानिकांना मंदिरात विश्वस्त तसेच अगदी कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली जाते. उलट विश्वस्तांच्या पाहुण्यांना व्हीआयपी सेवा मिळते. विश्वस्तांच्या कुटूंबियांना ये - जा करायला देवस्थानची वाहने वापरली जात आहेत.
        
 ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, संस्थान कमिटीवर जाणूनबुजून आळंदीकरांना डावलले जात आहे. प्रमुख विश्वस्तांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत सर्वांसमोर येऊन जाहीर माफी मागावी. ऍड. स्मिता घुंडरे म्हणाल्या, तीनवेळा आलेल्या विकास आराखड्याचा भार स्थनिकांवर आला. वारकऱ्यांसाठी हा भार आम्ही सहन करता. असे असतानाही आळंदीकरांचे योगदान काय? असे बेताल वक्तव्य कसे केले जाते. गावकऱ्याना कमिटीवर संधी दिली पाहिजे. अद्यापपर्यंत एकही महिला विश्वस्तपदी निवडण्यात आली नाही.
             
ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी म्हणाले, विद्यमान विश्वस्तांच्या शिफारसीने नवीन नियुक्त्या होत आहेत. अशावेळी ज्यांना ज्ञानेश्वरी माहीत नाही. वारकरी संप्रदायाचा कुठलाही अभ्यास नाही, अशांना विश्वस्त म्हणून निवडले जाते ही शोकांतिका आहे. परगावाहून आलेल्यांनी आम्हाला योगदान काय? असे विचारणे योग्य नाही. या प्रश्नासाठी भविष्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व वारकरी संप्रदाय एकत्र येईल.

Web Title: Kartiki celebrations begin and end; A protest march in the city against the absurd statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.