आनंदाने नांदू लागली ५५१ जोडपी; घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांचे बारामतीत समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:59 PM2018-02-03T14:59:53+5:302018-02-03T15:06:03+5:30

योग्य समुपदेशनामुळे ही जोडपी पुन्हा सुखाने नांदू शकतात. असेच विधायक कार्य बारामती परिसरात सुरू आहे. येथील समुपदेशन केंद्रामुळे ५५१ जोडपी आपापसांतील वाद संपवून पुन्हा एकदा आनंदाने नांदू लागली आहेत.

Joy got 551 couples; counseling from Baramati police for couples who applying for divorce | आनंदाने नांदू लागली ५५१ जोडपी; घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांचे बारामतीत समुपदेशन

आनंदाने नांदू लागली ५५१ जोडपी; घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांचे बारामतीत समुपदेशन

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१८ अखेर ५७४ कुटुंब घटस्फोटाच्या मार्गावर५५१ जोडप्यांचे बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे यशस्वी समुपदेशन

अविनाश हुंबरे
सांगवी : विवाह हा दोन जीवांच्या आयुष्यभराच्या सोबतीचा एक सुंदर अविष्कार असतो. मात्र आधुनिक जीवनशैली, वाढते ताणतणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद यामुळे वितुष्ट येऊन घटस्फोटापर्यंत ही प्रकरणे जातात. मात्र योग्य समुपदेशनामुळे ही जोडपी पुन्हा सुखाने नांदू शकतात. असेच विधायक कार्य बारामती परिसरात सुरू आहे. येथील समुपदेशन केंद्रामुळे ५५१ जोडपी आपापसांतील वाद संपवून पुन्हा एकदा आनंदाने नांदू लागली आहेत.
बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यातील समुपदेशन केंद्रामध्ये कौटुंबिक हिंसाचार व वादाला कंटाळून ५७४ पीडित महिलांनी तक्रार नोंदवून दाद मागितली होती. डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१८ अखेर ५७४ कुटुंब घटस्फोटाच्या मार्गावर होते. यामधील ५५१ जोडप्यांचे यशस्वी समुपदेशन करण्यात आले आहे. त्यामुळे ही जोडपी आता सुखाने एकमेकां सोबत राहू लागली आहेत. समाजात ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणी  प्रमाणे घर म्हटले की वाद होतो. मग काही वेळेस घरातील महिलेला किरकोळ कारणावास्तव कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. पती-पत्नी यांच्या मध्ये सातत्याने होणारे वादविवाद मारहाण, दमदाटी जिवे मारण्याची धमकी, दारू मुळे घरात कौटुंबिक स्वास्थ धोक्यात येते. सासू-सासरे, ननंद, दीर यांच्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारे त्रास किंवा हुंड्याची मागणी, अपत्य न होणे, पत्नीवर संशय घेणे अशा विविध कारणांच्या समावेशामुळे अनेक जोडपी विभक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र काही महिला घरातील दबावाला घाबरुन आपल्यावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. सहाजिकच अशा महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबतात, माहेरी सांगितले तर त्यांना त्रास नको. मग न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्न अनेक महिलांना आज ही  पडत असतो. काही महिला जरा वेगळे धाडस करून आपला संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा महिला समुपदेशन केंद्रात धाव घेतात. समुपदेशन केंद्र देखील अतिशय संवेदनशीलपणे हे वाद आणि विषय हातळते. प्रत्येकाच्या जबाबदारीची आणि कुटुंबाच्या गरजेचे जाणिव जोडप्यांना करून देते. काही गोष्टी प्रेमाने समजुतीने सांगितल्या तर ही जोडपी सुद्धा आपआपसातील प्रेमाची कबुली देतात. भौतिक गोष्टींपेक्षा जोडीदाराची सोबत व विश्वास महत्त्वाचा असतो. याची जाणिव करून दिल्यावर अनेक जोडपी घटस्फोटाच्या विळख्यातून बाहेर पडतात. पुन्हा नव्याने आपल्या संसाराची सुरूवात करतात, असे समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक सुनिता शिंदे यांनी सांगितले. 

असा घडतो समेट...
पती-पत्नी व दोन्ही कुटुंबाना एकत्र बोलावून प्राथमिक स्वरूपात समुपदेशन करून कोमेजून गेलेल्या कुटुंबात समेट घडवून आणला जातो, यासाठी समुपदेशक सुनीता आत्माराम शिंदे आणि समुपदेशक राजेंद्र विठ्ठल खारतोडे प्रयत्न करतात. तर राहिलेल्या २३ खटल्यांवर अध्याप समुपदेशन सुरू आहे. त्या कुटुंबांना ही आम्ही १०० टक्के एका विचाराच्या प्रवाहात  आणून त्यांच्यात असणाऱ्या अविश्वासाच्या भिंती बाजूला सारून कुटुंबाला एकत्र  आणू असा विश्वास समुपदेशक सुनीता शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पीडित महिला आपल्याकडे न्याय मागण्यासाठी आल्यानंतर पीडित महिलेला सावरून तिच्याशी चर्चा केली जाते. कौटुंबिक हिंसाचाराबाबत सविस्तर माहिती घेऊन, तिच्याकडून रितसर अर्ज घेतला जातो. त्यानंतर त्रास देत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पतीला फोनद्वारे अथवा पत्राद्वारे संपर्क साधला जातो. अर्जदार व त्रास देणारा सदस्य यांच्यात वैयक्तिक संयुक्त समुपदेशन करून गैरसमज दूर करून समस्या जाणून घेतल्या जातात. त्यानंतर समस्या दूर कशा करायच्या त्याचे मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर दोन्ही कुटुंबाची एकत्र बैठक घेऊन सर्व गैरसमज दूर करून पती-पत्नी या दोघांच्या स्व-इच्छेने हमी पत्र लिहून घेऊन समझोता झाल्यानंतर महिन्यातून एकदा भेट घेणे पीडित महिलेला सर्व मदत करणे अशी विविध कामे समुपदेशन केंद्रातील सुनिता शिंदे आणि राजेंद्र खारतोडे करत असतात.

समुपदेशन केंद्राची स्थापना बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात मानवी हक्क दिवस १० डिसेंबर २०१४ रोजी झाली आहे. आत्तापर्यंत ५५१ निरागस कौटुंबिक वादातून प्राथमिक स्वरूपात सोडवणूक करून कुटुंबाना घरपण आणून त्यांचे मोडकळीस आलेल्या संसाराला समुपदेशनाच्या माध्यमातून धीर देण्याचे काम आम्ही करतो, त्यामुळे  नैराश्य, कोर्ट कचेरीचा  पुढील वेळ काळ पैसा वाचतो, ही प्रकरणे कोर्टात जाऊन त्यातून काहीच निष्पन्न होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही आजपर्यंत अनेक पती-पत्नी यांच्यातील प्राथमिक स्वरूपावर गैरसमज दूर करून ते आज गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यामुळे ज्या महिलेवर कौटुंबिक हिंसाचार होत असेल त्या महिलेने कुणाला बळी न पडता आमच्याकडे येऊन मार्ग अवलंबवावा.
- सुनीता  शिंदे, महिला समुपदेशक, बारामती

Web Title: Joy got 551 couples; counseling from Baramati police for couples who applying for divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.