येणारा काळ भारताचाच !

By admin | Published: February 28, 2017 01:25 AM2017-02-28T01:25:40+5:302017-02-28T06:51:41+5:30

माणसाचा जगण्याचा शोध सुरू झाला आणि विज्ञानाचा जन्म झाला.

India coming from! | येणारा काळ भारताचाच !

येणारा काळ भारताचाच !

Next

-डॉ. विजय भटकर

माणसाचा जगण्याचा शोध सुरू झाला आणि विज्ञानाचा जन्म झाला. तेव्हापासूनच माणूस संशोधक, शास्त्रज्ञ राहिलेला आहे. जगायच्या धडपडीतून त्याने दगडाची, धातूची अवजारे बनवायला सुरुवात केली. हा नवा शोधच होता. पुढे आगीचा शोध लागला... प्रत्येक दशकात आपण प्रगत होत होतोच; पण विसाव्या शतकातील वैज्ञानिक प्रगतीचा वेग हा थक्क करणारा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण कमालीची झेप घेतलेली आहे. प्रत्येक दशकात लागलेले शोध असा जर एक आलेख मांडला, तर त्यात विसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे हे लक्षात येते. त्यातून नवनवे आविष्कार जन्माला येतात. हे सारे शोध मानवी जीवनाशी एकरूप झालेले आहेत. लहानपणी गावात कार आली तरी मुलं त्याच्या मागे धावायची; आता मात्र क्षणाक्षणाला जगातील तंत्रज्ञान बदलतंय. त्याच्याशी जुळवून घेताना प्रत्यक्ष माणसाचीही दमछाक होतेय. वैद्यकीय तंत्रज्ञानात तर आपण इतकी प्रगती केलीय की तुटलेले अवयव आपण जोडू शकतो, ट्रान्सप्लांट करू शकतो, थांबलेलं हृदय सुरू करू शकतो. आता तर मानव आणि तंत्रज्ञान सोबत काम करताहेत. येणारा काळ हा तर मानवी शरीरावर तंत्रज्ञानाचा प्रभाव असेल. शरीरात विविध चिप्स बसवल्या जातील व ते माणसाचे जगणे अधिक सोपे करतील. एका अर्थाने हे तंत्रज्ञान माणसाच्या शरीरात शिरू पाहत आहे. यंत्र कोण आणि माणूस कोण अशी परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकेल. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमधून बाहेर पडून यंत्र आणि मानव हा भेदच कमी होईल की काय अशी शक्यता आता निर्माण होत आहे.
(कोलंबस वाट का चुकला ?)
माणसामाणसांत त्यामुळे दुरावा येतो आहे. बदलाचा वेग प्रचंड आहे. लहान मुले नवी यंत्रे चटकन आत्मसात करू शकतात, असा अनुभव आपल्याला येतो. ती शक्ती निसर्गत:च त्यांना दिलेली असते. हे बदल आपण थांबवू शकत नाही. प्रत्येक समस्या निर्माण झाली की त्याच्या निराकरणासाठी नवा शोध लावला जातो. हे चक्र अव्याहतपणे सुरू राहते. संगणकावर अतिक्रमण करणारे व्हायरस तयार झाले. त्यातून पुढे अँटीव्हायरस आले. आज म्हणूनच विज्ञानाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मूलभूत विज्ञानाकडे वळावे लागेल.
(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)
येणाऱ्या भारताचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आणि सकारात्मक असेल असे मला वाटते. विज्ञान-तंत्रज्ञान, संगणक, खगोलशास्त्र, आयटी, मेडिकल अशा सर्वच क्षेत्रांत जगातील अग्रगण्य अशा पहिल्या पाच देशांत आपण आहोत. ही खरोखर अभिमानाची बाब आहे. मात्र हे सारे असताना आपल्या देशाची संशोधन व विकासावर होणारी गुंतवणूक जगाच्या तुलनेत फारच अल्प आहे. एखाद्या मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीपेक्षाही ते कमी आहे. सध्या ते १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. ते वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संशोधन विद्यापीठे वाढवावी लागतील. संशोधनपूरक व प्रेरक असे वातावरण उभे करावे लागेल. सध्या चीनपेक्षा आपण मागे आहोत; परंतु आपल्याकडे लोकशाही व्यवस्था असताना आपण जो काही चमत्कार केला आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे. येणारा काळ भारताचाच आहे, हे मात्र निश्चित.
>महान शास्त्रज्ञांनी जग बदलणारे जे जे शोध लावले त्यामध्ये त्यांनी कधीही पैशाकडे पाहून काम केले नाही. मात्र सध्या सर्वच गोष्टी पैसाकेंद्रीत झालेल्या आहेत. संशोधन करायचे तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. कष्ट उपसावे लागतात. केवळ फायद्याचा विचार करून चालत नाही. मुलभूत विज्ञानाचा अभ्यास त्यामुळेच सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. त्यासाठी शालेय स्तरापासून इन्स्पायरसारखे उपक्रम राबवले जात आहेत. आयआयटीमध्ये मुलभूत विज्ञानावर भर दिला जात आहे. या साऱ्या सकारात्मक दिशेने होत असलेल्या गोष्टी आहेत.

(लेखक प्रख्यात संगणकतज्ज्ञ व महापरमसंगणकाचे निर्माते आहेत.)
 

Web Title: India coming from!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.