Increase in Dengue Suspected Patients | डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ
डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ

पुणे : पावसाळा सुरु झाल्याने जागाेजागी पाणी साठण्यास सुरुवात झाली अाहे. त्यातच घराच्या छतावर, गॅलरीमध्ये ठेवलेल्या अडगळीच्या समानात पावसाचे पाणी जमा हाेत असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती हाेत अाहे. पुण्यात गेल्या अाठवड्यात डेंग्यूचे 46 संशयित रुग्ण अाढळले असून, जानेवारीपासून 28 जूनपर्यंत 176 डेंग्यूचे संशयित रुग्ण अाढळले अाहेत. त्यामुळे नागरिकांनी अापल्या घराजवळ तसेच घराच्या छतावर, गॅलरीत पावसाचे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेण्याचे अावहन पालिकेकडून करण्यात अाले अाहे. 


     पावसाळा सुरु झाल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणिया यांसारख्या विषाणूजन्य अाजारांचा प्रादूर्भाव हाेत असताे. या अाजारांच्या रुग्णांची संख्या या काळात वाढत असते. अस्वच्छतेमुळे साठलेले पाणी, घरात साठवण्यात अालेले पाणी, टायर, शहाळे यांमध्ये पाणी साठल्याने डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती हाेत असते. त्याचबराेबर सोसायटी आणि घरातील पाण्याच्या टाक्या आणि इमारतींच्या आजूबाजूला पडलेले भंगार सामान, घरातील ड्रममध्ये साठवून ठेवलेले पाणी अादी ठिकाणी सुद्धा डेंग्यूचे डास अाढळतात. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत अाहे. 


    महापालिकेचे सहाय्यक अाराेग्य अधिकारी डाॅ. संजीव वावरे म्हणाले, पावसाळा सुरु झाल्यामुळे डेंग्युच्या डासांची उत्पत्ती वाढली अाहे, तसेच डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली अाहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती राेखण्यासाठी महापालिकेकडून पाऊले उचलण्यात येत असून पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात येत अाहे. प्रत्येक परिमंडळांतर्गत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती कशी हाेते, याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात अाले अाहे. त्याचबराेबर 150 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डेंग्यूची उत्पत्ती हाेणाऱ्या ठिकाणी अाैषध फवारणी करण्यात येत अाहे. नागरिकांनी अापल्या परिसरात, तसेच घरात काेठेही पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याची गरज अाहे. 

 


Web Title: Increase in Dengue Suspected Patients
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.