मिळकत कर वसुलीचाच वाजतोय ‘बँड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:24 AM2019-03-03T00:24:22+5:302019-03-03T00:24:33+5:30

बेडकीच्या पोटाप्रमाणे दरवर्षी फुगत चाललेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा डोलारा ज्यावर उभा केला जात आहे, त्या मिळकतकराच्या थकबाकीचा ‘बँड’ वाजत असल्याचे चित्र आहे.

 Income tax reimbursement as 'band' | मिळकत कर वसुलीचाच वाजतोय ‘बँड’

मिळकत कर वसुलीचाच वाजतोय ‘बँड’

Next

- लक्ष्मण मोरे 
पुणे : बेडकीच्या पोटाप्रमाणे दरवर्षी फुगत चाललेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा डोलारा ज्यावर उभा केला जात आहे, त्या मिळकतकराच्या थकबाकीचा ‘बँड’ वाजत असल्याचे चित्र आहे. शहरातील पाच लाख आणि त्यावरील थकबाकीदारांची यादी तब्बल साडेपाच हजारांच्या घरामध्ये असून या सर्वांकडे एकूण १ हजार ८ कोटी ९२ लाख १२ हजार ४२४ रुपयांची थकबाकी आहे. ‘सॉफ्ट टार्गेट’च्या घरापुढे बँड वाजवणारी पालिका बड्यांवर वसुली करण्यात मात्र हात आखडता घेत आहे.
महापालिकेकडून मिळकतकराची आणि थकबाकीची वसुली करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये थकबाकीदारांच्या घरापुढे तसेच कार्यालयांपुढे बँड वाजविणे, प्रत्यक्ष मालमत्तांना सील ठोकणे, मिळकतींवर बोजा चढविणे, संवादाच्या माध्यमातून कर वसुली करणे आदी उपायांचा समावेश आहे. यासोबतच अधूनमधून अभय योजनेसारख्या सवलतीच्या योजनाही आणल्या जातात. मात्र, तरीही थकबाकीचा आकडा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे या थकबाकीदारांमध्ये वर्षानुवर्षे कर थकविणाऱ्यांचीच संख्या अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
मध्यमवर्गीय आणि कारवाईला घाबरणारे नागरिक स्वत:हून त्यांचा कर पालिकेकडे जमा करतात. आॅनलाइन सेवा सुरु झाल्यापासून डिजिटल प्रक्रियेद्वारे कर भरणा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पालिकेकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत (एप्रिल आणि मे) कर भरणाºया नागरिकांना सवलतही देण्यात येते. गेल्या वर्षभरात जवळपास साडेतीन लाख नागरिकांनी आॅनलाइन किंवा स्वत: पालिकेमध्ये येऊन कराचा भरणा केला आहे. एकूण मिळकरधारकांच्या तुलनेत हे प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. मात्र, हाच कर वसूल करण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यांत प्रशासनाला खूप कष्ट घ्यावे लागतात.
अनेक करदात्यांकडे थक बाकीची रक्कम अधिक दिसते. मात्र, अनेकांची ही रक्कम भरण्याची क्षमताच नाही. यासोबतच अनेकांना पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक वर्षे बिलेच मिळाली नसल्याचीही उदाहरणे आहेत. तशा तक्रारी घेऊन अनेक थकबाकीदार पालिकेमध्ये येत असतात. त्यामुळे अशा थक बाकीदारांचा आढावा घेऊन त्यांना बिले देण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. जुने वाडे, गावठाणे, कोंढवा आदी परिसरातील नागरिकांचा कर आणि त्यावरील दंड एकदम वाढल्यामुळेही वसुलीमध्ये अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
>१ हजार ८० कोटी रुपयांची वसुली : दंडातून ३६ कोटी
महापालिकेच्या करसंकलन विभागाने आतापर्यंत १ हजार ८० कोटी रुपयांच्या मिळकतकराची वसुली केली आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत आणखी १०० कोटींची वसुली होईल, अशी आशा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालिकेला मागील वर्षामध्ये केवळ थकबाकीच्या दंडामधून ३५ ते ३६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये जमेचा रुपया देण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्या घटकामधून किती टक्के उत्पन्न मिळणार, याचे विवरण देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून येईल. हे प्रमाण ३० टक्के आहे. तर त्या खालोखाल मिळकतकराच्या माध्यमातून एकूण उत्पन्नापैकी २८ टक्के उत्पन्न मिळेल, असे दर्शविण्यात आलेले आहे. मिळकतकराची वसुली करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा ठोस कार्यक्रम नेमका काय आहे, याबाबत स्पष्टपणे काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही.मिळकतकरासोबतच शहरातील मोबाइल टॉवर्सची थकबाकीही मोठी आहे. शहरामध्ये मोबाइल टॉवर उभ्या
केलेल्या अकरा कंपन्यांकडून तब्बल
७०० कोटींपेक्षा अधिक रक्कम पालिकेला येणे बाकी आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये या कंपन्यांनी २ हजार ३०० मोबाइल टॉवर्स उभे केलेले आहेत.
>
>पालिकेकडून थकबाकीदारांची वसुली करण्यावर भर दिला जात आहे. मिळकत कर विभागाने आतापर्यंत जवळपास ७५० मिळकतींना सील ठोकले आहे. तर तीन मिळकतींवर बोजा चढविला आहे. यासोबतच आणखी सहा मिळकतींची नावे बोजा चढविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. ज्यांनी कर भरलेला नाही अथवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे, त्यांनी तातडीने पालिकेकडे थकबाकी भरावी. शहराच्या विकासामध्ये कर भरून हातभार लावावा. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
- विलास कानडे,
प्रमुख, कर आकारणी व कर संकलन विभाग
अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी पाणीपट्टी आणि मिळकतकराची थकबाकी वसूल करुन तूट भरुन काढू, उत्पन्न वाढवू, अशा वल्गना केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात त्या प्रमाणात थकबाकी वसूल होत नाही. पाच लाखांवरील थकबाकीदारांची एवढी मोठी यादी असताना त्याची वसुली का होत नाही. त्यामागे राजकीय दबाव आहे. वर्षानुवर्षे थकबाकी ठेवणाºया या व्यक्ती आहेत तरी कोण? या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांना मिळायला हवीत. एकूणच ही आकडेवारी गंभीर आहे.
- विवेक वेलणकर,
सजग नागरिक मंच

Web Title:  Income tax reimbursement as 'band'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे