अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:36 AM2024-01-22T11:36:21+5:302024-01-22T11:38:14+5:30

पुण्याहून ढोलपथक, शंखनादपथकही गेले असून, श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढण्यातही पुणेकरांचा सहभाग

In Ayodhya the Pranapratistha Muhurta with Dholpathak Sanai Chaughda Participation of Punekars | अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग

अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग

पुणे: ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम धार्मिक नगरी अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक आहे. महाराष्ट्रातील एक तरुणही सध्या चर्चेत आहे. हा तरुण पुणे ते अयोध्या अशा सायकल प्रवासाला निघाला आहे. बलराम वर्मा असे या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. पुण्याहून अयोध्येला जायला निघालेला हा तरुण रस्त्यामध्ये त्याला जे जे लोक भेटतात, त्या लोकांना तो प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देत आहे.

पुण्याहून ढोलपथक, शंखनादपथकही गेले असून, श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढण्यातही पुणेकरांचा सहभाग आहे. अयोध्येत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चवदेखील चाखायला मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी पुण्यातील माजी सैनिक स्वर्गीय दरोगा सिंग यांच्या कुटुंबीयांनी एक किलो चांदीची वीटदेखील अर्पण केली आहे .

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या परिसरातील मल्टिलेव्हल पार्किंगसह फूडकोर्ट, रुफटॉप रेस्टॉरंट चालवण्याचे काम मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीला मिळाले आहे. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ क्षेत्रातील उत्तम ब्रॅंड तेथे आता मिळणार आहेत; त्यामुळे अयोध्येत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळणार आहे. यासह अयाेध्येत ३८ ठिकाणी बहुमजली पार्किंग उभी केली जाणार आहे. यांतील पहिले सहा मजली पार्किंगचे काम त्यांना मिळाले आहे. पार्किंगबराेेबरच फूड काेर्ट, रेस्टारंट, रुफ टाॅप हाॅटेलही तेच चालवणार आहेत. संबंधित मल्टिलेव्हल पार्किंगमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरवल्या गेल्यात. मोबाइल ॲपच्या माध्यमातून गाडी पार्क करण्यासाठी कुठे जागा आहे, जितका कालावधी गाडी पार्क केली असेल तितकेच पैसे फास्टटॅगमधून घेतले जाणार आहेत.

ढोलपथकाचे सादरीकरण

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात गेल्या २५ वर्षांपासून ढोल-ताशांचे वादन करत महाराष्ट्राची संस्कृती जोपासणाऱ्या श्रीराम पथकाला अयोध्येतील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत ढोल-ताशा वादन करण्याची संधी मिळाली आहे. श्री रामजन्मभूमी न्यासाकडून श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल-ताशा वादन करण्याचे आमंत्रण मिळाले असून महाराष्ट्राच्या, पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथक ढोल-ताशावादनाने श्रीरामांच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे. याचबरोबर पथकाला काशीविश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे.

प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढण्यातही पुणेकर

श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील ठरावीक मोजक्याच विद्वान ज्योतिष्यांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुन:स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटाही पुणेकरांसाठी आणि मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे.

कोण आहेत गौरव देशपांडे...

गौरव देशपांडे हे महाराष्ट्रात गेली १३ वर्षे सूर्यसिद्धान्तीय देशपांडे पंचांग प्रकाशित करीत आहेत. १४ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर अजूनही आपला आयटी व्यवसाय सांभाळून ते पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यांत उल्लेखनीय काम करत आहेत. बंगळुरू येथील कुडली श्रृंगेरी पीठातर्फे त्यांना ‘ज्योतिर्विद्यावाचस्पती’ ही उपाधी प्रदान करण्यात आली असून, कुंडली श्रृंगेरी पीठाचे अकरावे शंकराचार्य मठाधिपती श्री श्री विद्याविद्येश्वर भारती यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

पुणेकर कलाकार तुतारी वाजवून करणार स्वागत

पुण्यातील सनई-चौघडा, तुतारीवादन करणाऱ्या पाचंगे कलाकारांना अयोध्येचे महापौर त्रिपाठी यांनी विशेष आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी दोन तुतारी वाजवून स्वागत केले जाणार आहे. याशिवाय श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी सनई-चौघडा वाजवण्याचा मान रमेश पाचंगे, भरत पाचंगे आणि राजू पाचंगे यांना मिळाला आहे.

Web Title: In Ayodhya the Pranapratistha Muhurta with Dholpathak Sanai Chaughda Participation of Punekars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.