Pune News | खेड-शिवापूर परिसरात ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:28 PM2023-04-03T17:28:59+5:302023-04-03T17:30:44+5:30

याप्रकरणी रमेश चौधरी (सध्या रा. श्रीरामनगर, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे...

Gutkha worth Rs 55 lakh seized in Khed-Shivapur area; Rajgad police action | Pune News | खेड-शिवापूर परिसरात ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

Pune News | खेड-शिवापूर परिसरात ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

googlenewsNext

खेड-शिवापूर (पुणे) : राजगड पोलिसांनी रविवारी केलेल्या छापेमारीत श्रीरामनगर बांडेवाडी हद्दीतील व शिंदेवाडी हद्दीतील दोन गोडावूनमधून सुमारे ५५ लाख ६२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये श्रीरामनगर हद्दीतील एका गोडावूनमध्ये शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला यांनी भरलेली काही पोती व बॉक्स आढळून आले. त्याचबरोबर दुकानदाराकडे सखोल चौकशी केली असता संबंधित दुकानदाराने शिंदेवाडी तालुका भोर, जिल्हा पुणे या गावच्या हद्दीमध्येही एका पत्र्याच्या शेडमध्ये अशाच प्रकारचा माल लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली. त्या ठिकाणीही पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली.

या कारवाईमध्ये सुमारे ५५ लाख ६२ हजार ९१२ रुपये किमतीचा पानमसाला, गुटखा, सुगंधी मसाला, तीन लाख ४५ हजार रुपये रोख रक्कम त्याचबरोबर ६ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण ६५ लाख १८ हजार रुपये किमतीचा संबंधित मुद्देमाल पंचनामा करून तत्काळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी रमेश चौधरी (सध्या रा. श्रीरामनगर, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.

राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पो. ह. संतोष तोडकर, राहुल कोल्हे, महादेव शेलार, सागर गायकवाड, अजित भुजबळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी हे करीत आहेत.

खरंतर हे काम अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे. या कारवाईत मनुष्यबळाअभावी कायमच अन्न औषध प्रशासन विभाग सहभागी होण्यास टाळाटाळ करतो. अनेक वेळा कर्मचारी नाहीत, मनुष्यबळ कमी आहे, संबंधित कारवाई तुम्हीच करा, अशा प्रकारचे लेखी वा तोंडी उत्तर पोलिस प्रशासनाला देऊन कारवाईत सहभाग घेण्यास संबंधित विभागामार्फत टाळाटाळ केली जाते.

Web Title: Gutkha worth Rs 55 lakh seized in Khed-Shivapur area; Rajgad police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.