भोर, वेल्ह्यातील दुर्गम शाळांना शिक्षक द्या, स्थायी सभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 12:39 AM2018-12-22T00:39:01+5:302018-12-22T00:39:24+5:30

पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भोर तालुक्यात १०४ शाळांमध्ये अद्यापही शिक्षक रुजू झाले नाहीत, तर वेल्हे तालुक्यातील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत

Give teacher to inaccessible schools in Bhor, Velha | भोर, वेल्ह्यातील दुर्गम शाळांना शिक्षक द्या, स्थायी सभेत मागणी

भोर, वेल्ह्यातील दुर्गम शाळांना शिक्षक द्या, स्थायी सभेत मागणी

Next

पुणे : जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भोर तालुक्यात १०४ शाळांमध्ये अद्यापही शिक्षक रुजू झाले नाहीत, तर वेल्हे तालुक्यातील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. या शाळेवर शिक्षक नेमण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही केवळ मुळमुळीत उत्तरे दिली जातात. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी सर्व सभासदांसोबत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला.
जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी सभागृहात अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २१) स्थायी समितीची बैठक पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री, सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख महादेव घुले यांच्यासह समितीचे सदस्य आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांनंतर अनेक शाळांत शिक्षक अद्यापही रुजू झालेले नाहीत. यात भोर आणि वेल्हे तालुक्यातील संख्या जास्त आहे. वेळोवेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही ही पदे भरली जात नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सभासदांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
शिवतरे म्हणाले, की प्रशासनाने दुर्गम भागातील शाळेत बदल्या झाल्यानंतर शिक्षकांना रुजू होण्यास सांगितले. मात्र, अनेकांनी कारणे देत नेमून दिलेल्या शाळेवर रुजू होण्यास असमर्थता दर्शविली. अशा शिक्षकांवर थेट कारवाईची मागणी यावेळी त्यांनी केली. याबाबत तक्रारी केल्यास केवळ मुळमुळीत उत्तरे आम्हाला मिळतात. यामुळे या प्रश्नावर दोन दिवसांत तोडगा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
बाहेरील जिल्हा परिषदेतील बदली होऊन जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची संख्या यात जास्त आहे. ते प्रशासनाला सहकार्य करीत नसतील तर त्यांना परत त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्यात यावे, अशी मागणीही सभासदांनी यावेळी केली.

आंतरजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना समानीकरणानुसार पदस्थापना देण्यात येणार आहे. त्याना त्यांच्या पसंतीने शाळा मिळावी यासाठी समुपदेशन ठेवण्यात आले. परंतू, शिक्षक समुपदेशनाला हजर राहिले नाही. ज्या तालुक्?यात अधिक जागा रिक्त आहेत त्याठिकाणी प्राधान्याने शिक्षक देण्यात येणार आहे. ज्यांना मान्य नाही त्यांना परत ज्या जिल्ह्यातून आले त्याठिकाणी पाठविण्यात यावे. त्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये सदस्य आणि पदाधिकारी यांनीही एकमताने संमती दर्शवली आहे. त्यामुळे जे शिक्षक तयार होतील त्यांना पदस्थापना देण्यात येईल.
- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर अनेक शिक्षकांना दुर्गम भागातील जागा मिळाल्या. मात्र, यातील अनेक शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. जवळपास
४०० शाळांतील पदे ही रिक्त आहेत.
यात भोर आणि वेल्हे तालुक्याची संख्या जास्त आहे. भोरमध्ये जवळपास १०४ शाळा व वेल्हेतील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

Web Title: Give teacher to inaccessible schools in Bhor, Velha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.