वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे...! स्वरांच्या नामघोषात दगडूशेठचा गणेशजन्म उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:41 PM2024-02-13T16:41:14+5:302024-02-13T16:41:27+5:30

लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी

Ganesh birth of celebration in Dagdusheth temple pune | वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे...! स्वरांच्या नामघोषात दगडूशेठचा गणेशजन्म उत्साहात

वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे...! स्वरांच्या नामघोषात दगडूशेठचा गणेशजन्म उत्साहात

पुणे : वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला. मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्पसजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्रीं चरणी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, प्रियांका गोडसे आणि  ओंकार मोझर, वृषाली मोझर यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई आणि बाल गणेशाची रूपे पुष्पसजावटीमध्ये साकारण्यात आली होती. 
 
महिलांनी जन्माचा पाळणा, गणेश गीत व  गणपतीचा गजर केला. मुख्य जन्म सोहळ्याच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. गणराज गजानन गावा हो, राजा गजानन गावा हो...हे गीत देखील सादर केले. लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

मंगळवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक आणि त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत किराणा घराण्याच्या गायिका विदुषी पद्मा देशपांडे यांनी स्वराभिषेकातून श्रीं च्या चरणी गायनसेवा अर्पण केली. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक देखील झाले.

सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर रामेश्वर चौक- टिळक पुतळा मंडई - कोतवाल चावडी - बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक - नू.म.वि. प्रशाला अप्पा बळवंत चौक - तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप होईल.  

Web Title: Ganesh birth of celebration in Dagdusheth temple pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.