‘भाई’ चित्रपटातून गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:30 AM2019-01-30T03:30:23+5:302019-01-30T03:30:35+5:30

बडोदेकर यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांचा आरोप; चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन

Ganabhai Hirabai Badodekar's slander from 'Bhai' movie | ‘भाई’ चित्रपटातून गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची बदनामी

‘भाई’ चित्रपटातून गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची बदनामी

Next

पुणे : ^‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात गुरुवर्या हिराबाई बडोदेकर यांच्या संबंधात जे चित्रण झाले आहे ते पाहून खूप वाईट वाटले आणि रागही आला. केवळ हिराबार्इंच्या काळातच नव्हे, तर आजही एक आदर्श स्त्री कलाकार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्यंत शालीन, सौम्य, मृदू पण भारदस्त असे त्यांचे वागणे-बोलणे होते. हा चित्रपट हिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला बदनाम करणारा, घोर अपमान करणारा असा आहे, अशा कडव्या बोलातून ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी चित्रपटावर ताशेरे ओढले. या चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वीच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या बुजुर्ग कलाकारांवर चित्रित करण्यात आलेले प्रसंग हीन दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या दैवतांचे असे विद्रूपीकरण रसिकांनी खपवून घेऊ नये, असे आवाहन गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक निशिकांत बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी तसेच हिराबाई बडोदेकर यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर यांनी केले होते. त्यापाठोपाठ आता पं. सुरेशबाबू माने आणि त्यांची धाकटी भगिनी गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनीही चित्रपटातील हिराबाई बडोदेकर यांच्या रेखाटलेल्या व्यक्तिमत्त्वावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे आक्षेप नोंदविला आहे.

हिराबाईंचे घर हे सर्व कलाकारांसाठी स्वरमंदिर होते. लहानमोठे अनेक कलाकार हिराबाईंच्या घरी जाऊन हजेरी लावत असत. सगळ्यात कळस म्हणजे या चित्रपटात त्यांचे घर म्हणजे दारू मिळण्याची जागा आहे, असे दाखविले आहे. खरं म्हणजे हा चित्रपट मद्यपानावर आहे की काय, अशी शंका येते. हिराबाईंच्या घरी जाण्यापूर्वी पु.ल., वसंतराव व भीमसेन जोशी यांच्यामधील संभाषण, तसेच दार उघडताना हिराबाईंचे बोलणे, मैफल चालू असताना दोन गाण्यांमधील पु.ल., वसंतराव व भीमसेन जोशी यांच्यामधील संभाषण व अभिनय या सर्वांमुळे हिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन झाला असल्याचा आरोप डॉ. प्रभा अत्रे यांनी केला आहे.

ज्यांच्यावर चित्रपट करतो त्या व्यक्तींचे हावभाव, बोलणे, चालणे हेही तपासून घेणे जरुरीचे आहे. कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यावर जास्तीत जास्त प्रकाश अशा चित्रपटातून टाकायला हवा. सामान्य असूनही ही माणसे असामान्य कार्य करतात हे दाखविणे गरजेचे आहे,अशी समजही त्यांनी दिग्दर्शकांना दिली. या चित्रपटाशी संबंधित अधिकृत व्यक्ती, प्रेक्षक, शासन व या चित्रपटाला परवानगी देणारे मंडळ या सर्वांनी या गोष्टीची दाखल घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा डॉ. प्रभा अत्रे यांनी प्रसिद्धिपत्रकात व्यक्त केली आहे.

तिघांपेक्षा हिराबाई १५ ते २० वर्षांनी मोठ्या...
पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी व पं. वसंतराव देशपांडे यांच्यापेक्षा हिराबाई १५ ते २० वर्षांनी मोठ्या होत्या. तरीही, या चित्रपटात या तिन्ही व्यक्तिमत्त्वांच्या मुखी त्यांचा एकेरी उल्लेख केल्याचे दाखविण्यात आले आहे. आपल्यापेक्षा एका मोठ्या आदरणीय अशा स्त्री कलाकाराला एकेरी नावाने संबोधणे आजही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. हिराबाईंच्या काळात तर नाहीच; पण आजही विशेषत: शास्त्रीय संगीत क्षेत्रात उभे राहून टाळ्या वाजवणारी स्त्री कलाकार आढळणार नाही. चित्रपटात हिराबार्इंचे काम करणारी स्त्री समवयाची दाखवली आहे आणि तिचे हावभावही भडक आहेत, असे डॉ. अत्रे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Ganabhai Hirabai Badodekar's slander from 'Bhai' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.