ग्रामीण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 01:09 PM2019-07-11T13:09:02+5:302019-07-11T13:14:58+5:30

बहुतांश ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याऐवजी विना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश दिला जातो.

fruad with students from rural colleges | ग्रामीण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट

ग्रामीण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट

Next
ठळक मुद्देअनुदानित तुकड्यांचे शुल्क कमी असल्याने तिथे मिळवण्यास प्रयत्नशील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना विना अनुदानित तुकडीत प्रवेश घेण्याबाबत आग्रह

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याऐवजी विना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश दिला जातो. परिणामी विद्यार्थ्यांना अधिकचे शुल्क भरून महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षात प्रवेश घ्यावा लागतो. एका अर्थाने ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लुटच केली जात आहे.
राज्य शासनाकडून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील तुकड्यांना अनुदानित व विना अनुदानित तत्त्वावर मान्यता दिली जाते.अनुदानित तुकड्यांचे शुल्क कमी असल्याने सर्वच विद्यार्थी अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करतात.तसेच विना अनुदानित तुकड्यांचे शुल्क अधिक असल्याने काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना विना अनुदानित तुकडीत प्रवेश घेण्याबाबत आग्रह केला जातो.मात्र,विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश दिला तर त्यांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो.त्यामुळे प्राचार्यांनी स्वत:च विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.परंतु,बहुतांश प्राचार्यांकडून याबाबत प्रयत्न केले जात नाहीत.
 घरा जवळील महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आपल्या परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. सर्व साधारणपणे प्रथम वर्ष कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या अनुदानित व विना अनुदानित या दोन्ही तुकड्यांमध्ये १२० विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, काही विद्यार्थी प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्यामुळे किंवा त्यांनी शिक्षण सोडून दिल्यामुळे अनुदानित तुकडीत जागा रिक्त राहतात. त्यामुळे विना अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांना द्वितीय व तृतीय वषार्साठी अनुदानित तुकडीत प्रवेश देणे शक्य होते. परंतु,महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेश विना अनुदानित तुकडीतच कायम ठेवले जातात.
साधारणपणे महाविद्यालयात द्वितीय वषार्साठी १० ते २० जागा रिक्त होतात. तर तृतीय वर्षात २० ते ४० जागा रिक्त होतात. त्यामुळे महाविद्यालयाकडून या जागांवर विना अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देवून दिलासा देता येऊ शकतो. परंतु, शिष्यवृत्ती संदभार्तील प्रशासकीय कामकाज वाढणार असल्यामुळे महाविद्यालयांकडून या प्रवेशाबाबत टाळाटाळ केली जाते, असे बोलले जात आहे.
-
अनुदानित व विना अनुदानित दोन्ही तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.त्यामुळे शिष्यवृत्तीचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याबाबत टाळाटाळ करणे अयोग्य आहे. विना अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांना द्वितीय व तृतीय वर्षात अनुदानित तुकडीत प्रवेश दिल्याने विद्यार्थ्यांचा शुल्काचा भार कमी होईल.त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून प्राचार्यांनी प्रवेश देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
-डॉ. विजय नारखेडे,सहसंचालक,उच्च शिक्षण,पुणे विभाग

Web Title: fruad with students from rural colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.