कोरोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार

By नितीश गोवंडे | Published: April 10, 2023 07:14 PM2023-04-10T19:14:30+5:302023-04-10T19:14:40+5:30

आदित्य ठाकरे यांनी संबंधित कंपनीला वरळी येथील कोरोना काळजी केंद्रातील अतिदक्षता विभागाचे कंत्राट दिल्याचा सोमय्यांचा आरोप

Former MP Somaiya's complaint to the police in the Corona care center malpractice case | कोरोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार

कोरोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार

googlenewsNext

पुणे : कोरोना संसर्गाच्या काळात कोणताही अनुभव नसताना लाईफ लाईन हाॅस्पिटल कंपनीला पुणे महापालिकेच्या कोरोना काळजी केंद्र चालवण्याचे कंत्राट देऊन मोठा गैरव्यवहार करण्यात आला. लाईफ लाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे संचालक सुजित पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

शिवाजीनगर येथील कोरोना काळजी केंद्राचे कंत्राट देताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपी सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी नगरसेवक दत्ता खाडे, पुष्कर तुळजापूरकर यांची यावेळी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग काळात राज्य शासनाने जुलै २०२० मध्ये कोराेना काळजी केंद्र सुरू केले होते. मुंबई महापालिका आणि पुणे महापालिकेकडून कोरोना काळजी केंद्राची उभारणी करण्यात आली होती. शिवाजीनगर येथील कोरोना केंद्र चालवण्याचे कंत्राट सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले. मात्र, संबंधित कंपनीने शासनाकडे रीतसर अर्ज केल्याचे, कंपनीची स्थापना कधी झाली, तीन वर्षांचा ताळेबंद याबाबतची माहिती दिली नव्हती. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने केवळ एक सादरीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर केले होते. या सादरीकरणाच्या आधारे ८०० रुग्ण क्षमतेचे करोना काळजी केंद्र चालवण्याचे कंत्राट देण्यात आल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पीएमआरडीए आणि करोना कृती दलाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ तेथे नव्हते तसेच पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने आठवडाभरात कोरोना काळजी केंद्राच्या कामकाजाबाबत रुग्ण आणि नातेवाइकांनी तक्रारी केल्या. संबंधित कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे महापालिकेने याबाबत २ सप्टेंबर २०२० राेजी पीएमआरडीएला अहवाल पाठवला होता. लाईफ लाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे अनुभव नसताना काम सुरू ठेवले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. ९ सप्टेंबर २०२० रोजी पीएमआरडीएने संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. मात्र, त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी संबंधित कंपनीला वरळी येथील कोरोना काळजी केंद्रातील अतिदक्षता विभागाचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Web Title: Former MP Somaiya's complaint to the police in the Corona care center malpractice case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.