चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:49 PM2019-07-22T13:49:28+5:302019-07-22T13:52:50+5:30

धरण अर्ध्या क्षमतेने भरले नसतानाही धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मंगळवारी (दि.१६) खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडले..

first water aawartan left from chaskaman dam? | चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही?

चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देकालव्याद्वारे सोडले पाणी : पिके जळू लागली, शेतकरी चिंतेत, राजकारण्यांचा हस्तक्षेप नको

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेले चासकमान धरण अर्ध्या क्षमतेने भरले नसतानाही धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मंगळवारी (दि.१६) खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आल्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न धरणांतर्गत असलेल्या गावांना पडला आहे. 
 दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिरूर तालुक्यातील काही नेते स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी चासकमान धरणाच्या पाण्याचे राजकारण करत आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय वजन वापरून कालव्याद्वारे पाण्याची मागणी करून सरकारकडून पाणी सोडून घेत असल्याचा आरोप करत धरणांतर्गत असलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उन्हाळ्यात धरणांतर्गत व भीमा नदीअंतर्गत पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळून गेली होती, तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भल्या पहाटेपासून दरवाजाच्या उंबरठ्यावरून पाणी दिसत असताना, धरण उशाला असतानाही नागरिकांना पाणी मिळत नव्हते. पर्यायाने रानोमाळ भटकंती करून पाणी शेंदून आणावे लागत होते.
परंतु उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात शिरूर तालुक्यातील काही नेत्यांनी पाण्याची मागणी केली असता पाणी सोडले जाते यामुळे परिसरातील नागरिकांनी कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तारखा जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली असून, धरण परिसरात एकूण ३७० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील २४ तासांत धरण परिसरात १३ मिलिमीटरइतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीला थोड्याफार पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला होता. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. धरणात पुरेशा पाणीसाठा नाही. धरणातून आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जून नंतर पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पाऊस सुरू होऊन दीड महिना झाला तरीही सध्या धरणे ५0 टक्के ही भरले नाहीत. त्यातच धरणातून पाणी सोडले जात आहे.
मागील वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत संततधार पडणाऱ्या पावसाने १६ जुलै रोजी ५३.५३ टक्के इतका पाणीसाठा झाला होता. तर  एकूण पाऊस ३५४ मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली होती. परंतु यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के इतका पाणीसाठा कमी शिल्लक असतानाही कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. 

चासकमान धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या आरळा नदीवरील कळमोडी धरणामधून १३० क्युसेक्स वेगाने चासकमान धरणामध्ये पाणी येत आहे. मागील वर्षी कळमोडी धरण ११ जुलै रोजी शंभर टक्के भरले होते. यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चासकमान धरण २१ जुलै रोजी ९७ टक्के भरल्याने संभाव्य पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडून पाच हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते.

.................

यावर्षी मात्र मागील वर्षीच्या तुलनेने धरण निम्मेही भरले नसताना कालव्याद्वारे पाणी सोडल्याने धरणांतर्गत असणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या धरणामध्ये ४७.७४ टक्के पाणीसाठा असून धरणाची पाणी पातळी ६४२.०१ मीटर आहे. 

* एकूण साठा १२९.६० दलघमी, तर उपयुक्त साठा १०२.४१ दलघमी आहे. पॉवर हाऊसद्वारे सोडण्यात आलेले पाणी बंद केले असून, डाव्या कालव्याद्वारे ५५० क्युसेक्स वेगाने आवर्तन सुरू आहे.
.........
चासकमान धरणामधून धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे धरणाच्या पाण्याचे कुठल्याही प्रकारे नियोजनाअभावी मंगळवारी दुपारी ३ वाजता सुरुवातीला ३०० क्युसेक्स वेगाने तर हळूहळू वेग वाढवत ५५० क्युसेक्स वेगाने खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मागील दोन आठवड्यापूर्वी झालेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाण्यात वाढ झाली होती; परंतु मागील मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने उघडीप घेत कडकडीत ऊन पडले आहे.

पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले प्रवाहीत होणे बंद होऊन धरणात होणारी पाण्याची आवक मंदावली असून, भविष्यात पाऊस कमी पडल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरणे अवघड होणार आहे. अशातच धरणाच्या कालव्याद्वारे धरणाअंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांना विश्वासात न घेता पाणी सोडल्याने धरण परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला 
जात आहे.
..............

Web Title: first water aawartan left from chaskaman dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.