आधी कलाकृतींचा आस्वाद घ्या

By admin | Published: April 10, 2017 02:45 AM2017-04-10T02:45:46+5:302017-04-10T02:45:46+5:30

पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही

First taste the artwork | आधी कलाकृतींचा आस्वाद घ्या

आधी कलाकृतींचा आस्वाद घ्या

Next

पुणे : पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही. तसेच कलाकृती आस्वाद न घेताच त्यावर टिप्पणी केली जाते, अशी खंत व्यक्त करीत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी कलाकृती न पाहून स्वत:ला त्यापासून वंचित ठेवतोय का? हा विचार करून आधी कलाकृतीचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले.
व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने माडगूळकर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त ज्ञानदा नाईक, अभिनेत्री अधिश्री अत्रे आदी उपस्थित होते. ‘बनगरवाडी’ या माडगूळकर यांची कथा-पटकथा असलेल्या चित्रपटाने महोत्सवाची सांगता
झाली.
पालेकर यांनी ‘बनगरवाडी’ या चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया उलगडत माडगूळकर यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘‘बनगरवाडीच्या रूपाने दिग्गजांनी नाकारलेली मुलगी माझ्या पदरात आली होती. त्यामुळे ही कलाकृती पडद्यावर उभी करण्याचे मोठे दडपण मनावर होते. पण पटकथालेखन करत असताना तात्यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला.
कलावंत, एक व्यावसायिक म्हणून आपल्या कलाकृतीकडे अलिप्तपणे पाहून त्यातील चुका स्वीकारण्याचे भान त्यांना होते. ही कलाकृती साकारत असताना त्यांनी कधीही मानपान, रुसवे आणले नाहीत, याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. गुणगुणत, एकाग्र होऊन लेखनाची त्यांची प्रक्रिया मनाला खूप भावली.’’
ज्ञानदा नाईक यांनी या वेळी तात्यांच्या आठवणींंना उजाळा दिला. शुभांगी दामले यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन माडगूळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

इतिहासात नोंद व्हावी
तात्यांच्या लेखनाचा तसेच विविध कलागुणांचा ठेवा स्मृतिरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याची इतिहासात कुठेतरी नोंद झाली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सांस्कृतिक इतिहास जतन करणे महत्त्वाचे असते; पण हे आपण करीत नाही. तात्यांच्या आठवणी जागविण्यासाठी हे खूप मोलाचे ठरेल, अशी अपेक्षाही पालेकर यांनी व्यक्त केली.
सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘लग्न होऊन आल्यानंतर आयकर रस्त्यावरील ‘अक्षर’ बंगला मला नेहमी खुणावत असे. त्यानंतर तात्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह वाढत गेला. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे, फुरसतीच्या जरतारी क्षणातूनच सृजनशील साहित्याचा जन्म होतो. हे क्षण जपून ठेवायला हवेत.’’

Web Title: First taste the artwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.