सर्वसामान्य रुग्णाला सुविधा द्या अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: October 13, 2023 03:51 PM2023-10-13T15:51:04+5:302023-10-13T15:51:42+5:30

दोन्ही महापालिका क्षेत्रात शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा, औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या

Facilitate the common patient otherwise strict action will be taken against the concerned; Deputy Chief Minister Ajit Pawar's warning | सर्वसामान्य रुग्णाला सुविधा द्या अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

सर्वसामान्य रुग्णाला सुविधा द्या अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

पुणे: सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्या. या संदर्भात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान गांभीर्याने राबवा, असेही निर्देश त्यांनी दिले.

पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बाेलत हाेते. या बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले, आरोग्याच्या सुविधांसाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. येत्या मार्चअखेरपर्यंत दोन्ही महापालिका क्षेत्रात खाटांची संख्या वाढवावी. ससून रुग्णालयात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सर्वसामान्य रुग्णाला लाभ झालाच पाहिजे. यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवावा. बाह्य स्रोताद्वारे वर्ग-४ पदे त्वरित भरावेत. शहरी भागात आयुष्मान कार्ड वितरणाच्या नोंदणीला गती द्यावी आणि जिल्हा राज्यात प्रथम राहील असे प्रयत्न करावे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थित राहतील यावर लक्ष द्यावे.

यावेळी डॉ. ठाकूर यांनी ससून रुग्णालयातील उपचार सुविधेत वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. यमपल्ले आणि डॉ. हंकारे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची माहिती दिली.

Web Title: Facilitate the common patient otherwise strict action will be taken against the concerned; Deputy Chief Minister Ajit Pawar's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.