शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात सरले कुलगुरूंचे पहिले वर्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:16 PM2018-05-18T21:16:58+5:302018-05-18T21:16:58+5:30

विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती.

end of first year Vice Chancellor in out of circle education | शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात सरले कुलगुरूंचे पहिले वर्ष 

शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात सरले कुलगुरूंचे पहिले वर्ष 

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : कुलगुरूंच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यावर भर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्या जाणे, दिग्दर्शक नागराज मंजुळे यास बेकायदेशीरपणे मैदान भाडयाने देणे, माहिती अधिकाराची योग्यप्रकारे अंमलबजावणी न करणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे परिपत्रक, शाकाहारी विद्यार्थ्यांनाच सुवर्णपदक देण्याची वादग्रस्त अट, आदी शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे पहिले वर्ष संपले आहे. केंद्र शासनाकडून विद्यापीठाला स्वायत्तेचा दर्जा मिळणे, एनआरएफमध्ये एका अंकाने वरची रँकिंग आदी सकारात्मक बाबी या काळात घडल्या. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमळकर यांच्या नियुक्तीला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झाले. एमएचा विद्यार्थी ते प्राध्यापक अशी सलग ३५ वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच घालवलेल्या डॉ. करमळकर यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांना विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती.  
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विद्यापीठाचे मैदान भाडयाने देण्याचा कुलगुरुंचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला. कायद्याचे उल्लंघन करून मंजुळे यांना मैदान भाडयाने देण्यात आले. सुरूवातीला ४५ दिवसांसाठी मैदान भाडयाने दिले असताना ६ महिने उलटले तरी अद्याप चित्रपटाचा सेट मैदानावर जैसे थे आहे.  विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा गंभीर प्रकार नुकताच उजेडात आला आहे. यापार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेतील या त्रुटी दूर करण्याचे आव्हान कुलगुरूंसमोर आहे. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणूकाच करण्यात आलेल्या नाहीत. माहिती अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी कुलसचिवांकडून दरमहा अतिरिक्त मानधन घेतले जात आहे आदी गंभीर बाबी उजेडात येऊनही त्याविरोधात अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. एनआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाच्या स्थानात एक अंकाने सुधारणा होऊन विद्यापीठाला नववे स्थान प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाकडून विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा बहाल, राज्यपालांच्या सुचनेनुसार संलग्न महाविद्यालयांनी स्वायत्ता घ्यावी यासाठी पुढाकार घेतला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यात यश येताना दिसत आहे. नाशिक आणि नगर उपकेंद्रांना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आदी सकारात्मक बाबीही गेल्या वर्षभरात घडल्या. 
.............
नव्या बदलांऐवजी ‘जैसे थे’ ची भूमिका 
नवीन कुलगुरूंच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी चांगले बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी जुन्या व्यवस्थामध्ये कोणतेही बदल न करण्याचे धोरण स्वीकारले. प्रभारी अधिष्ठाता, संचालक, प्रशासनाचे प्रमुख आदींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. परीक्षा विभाग, निवडणूक विभाग आदीमधील त्रुटी, कपाऊंडवर कोटयावधी रूपयांची उधळपट्टी, माहिती अधिकाराची योग्यप्रकारे अंमलबजावणी न होणे आदीबाबत ठोस कारवाई झाली नाही.   
प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यावर भर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये माध्यम समन्वय कक्ष स्थापन करून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सकरात्मक पाऊल उचलले. मात्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कमी भेटण्याचा शिरस्ता त्यांनी सुरूवातीपासून अवलंबला.

Web Title: end of first year Vice Chancellor in out of circle education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.