‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:03 AM2018-08-21T01:03:34+5:302018-08-21T01:04:19+5:30

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान टिकेल की नाही? लोकशाही मोडीत निघेल, असा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच ‘संविधान बचाओ’ या उद्दिष्टाने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Economy collapses during 'Modi' - Prithviraj Chavan | ‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण

‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण

Next

पुणे : अविचारी नोटाबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. देशाचा विकासदर साडेसहा टक्क्यांपर्यंत कोसळला. आर्थिक विकास दर मोजण्याच्या पद्धतीत आणि बेस इयरमध्ये बदल करून मोदी सरकारने सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना पैशांचा अमाप वापर, धार्मिक, जातीय ध्रुवीकरणासाठी भाजपाने कंबर कसली आहे. विरोधी पक्षांची आघाडी होऊ नये, यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरले जाऊ शकतात.

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान टिकेल की नाही? लोकशाही मोडीत निघेल, असा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच ‘संविधान बचाओ’ या उद्दिष्टाने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी जयंती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ‘देशापुढील आर्थिक आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.

‘राजीव गांधींनंतरचा भारत’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांचे व्याख्यान झाले. काँग्रेसचे />प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी
आमदार मोहन जोशी, समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, आमदार शरद रणपिसे, काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, सोनाली मारणे, राजीव जगताप, सूर्यकांत मारणे, नंदूशेठ पापळ, विवेक भरगुडे, महेश अंबिके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मोदी सरकारने योजना आयोग बंद करून, त्याऐवजी नीती अयोग आणला, असे सांगत चव्हाण म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसत असलेली अर्थव्यवस्थेची घसरण धक्कादायक आहे. राज्यात नवीन रोजगार निर्माण होताना दिसत नाही. व्यापारसुलभतेमध्ये राज्य तेराव्या क्रमांकावर गेले आहे.’’
फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा प्रकल्प राज्यात आलेला नाही. राज्यातील ३,५५७ कारखाने बंद पडले, सात-बारा कोरा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकले नाही. या परिस्थितीत कायदा करून कृषिमूल्य आयोगाला वैधानिक दर्जा दिला पाहिजे. हमीभाव आणि बाजारभावातील फरक देण्यासाठी भावांतर हमी कायदा लागू करावा. भावांतर पूर्ततेसाठी अंदाज पत्रकात तरतूद असावी.’’
अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘भारताला आधुनिकतेकडे घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचा लौकिक होता. देशाच्या आर्थिक विकास दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निर्यात बंद झाल्याने गुंतवणूक नाही, रोजगार नाही. मोदी सरकाच्या काळात केवळ योजनांचा कारखाना चालू आहे. जाहिरातबाजीमुळे सामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
‘‘तरुणाई चुकीच्या दिशेने भरकटत आहे. नेमके काय चालले आहे, खरे काय-खोटे काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. या समस्यांचा रस्त्यावर उतरून मुकाबला केला पाहिजे.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोपाळ तिवारी यांनी राजीव गांधी सप्ताहाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. हनुमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले.

खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवतात...
राजीव गांधी यांची १९९१मध्ये हत्या झाली. तेव्हा संगणक केवळ ११ वर्षांचा होता, गुगलचा जन्मही झाला नव्हता. देशाला संगणकाची गरज नाही; त्यामुळे देशात बेरोजगारी येईल, अशी ओरड
भाजपाचे नेते करत होते. आता तेच नेते आपणच मोबाईल, संगणक क्रांती केली, असा आविर्भाव आणतात. मोदी हेच देशाला तारू शकतात, हा समज सर्वदूर पसरला आहे. पुन्हा मोदींची सत्ता आली तर २६ मे २०१४ किंवा ६ डिसेंम्बर १९९२ हे स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित झाले, तर आश्चर्य वाटायला नको. सध्या सोशल मीडियावरून खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवली जाते. जितका खर्च परदेशी दौºयावर झाला, तितकेही भांडवल भारतात आलेले नाही. काँग्रेसला विरोध करतात, तरी काँगेसचे लोकच भाजपामध्ये घेतले जातात. आपल्याला राजीव गांधींच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे.
- कुमार केतकर

Web Title: Economy collapses during 'Modi' - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.