शॉर्टसर्किटमुळे विठ्ठलवाडीत तीन घरे झाली भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:32 AM2018-12-21T01:32:40+5:302018-12-21T01:33:08+5:30

१२ लाखांचे नुकसान : सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली

Due to the short circuit, three houses were destroyed in Vitthalwadi | शॉर्टसर्किटमुळे विठ्ठलवाडीत तीन घरे झाली भस्मसात

शॉर्टसर्किटमुळे विठ्ठलवाडीत तीन घरे झाली भस्मसात

Next

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील विंझर येथील विठ्ठलवाडीत (ता. वेल्हे) तीन घरे शॉर्टसर्किटमुळे भस्मसात झाली आहेत. ही घटना बुधवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली. विठ्ठलवाडीत काल रात्री ११.३०च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका घराने अचानक पेट घेतला अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांची त्रेधा उडाली. आग इतकी प्रचंड होती की शेजारील दोन घरेदेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या आगीमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रूप धारण केले.

माजी पंचायत समिती सदस्य संतोषअप्पा दसवडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान दाखविले व येथील युवकांच्या साहायाने शेजारी असलेल्या घरांना आगीपासुन वाचविले. या आगीत गणेश मारुती जगताप यांचे संपूर्ण घर जळाले आहे. आगीत त्यांच्या घरातील ४०० किलो तांदूळ, कपाट, टीव्ही सेट, पीठगिरणी, लाकडी कपाट, दिवान, सात तोळे सोने आणि सतरा हजार रुपये रोख जळून भस्मसात झाले. या वेळी लताबाई मारुती जगताप या एकट्याच घरात झोपल्या होत्या. आग लागलेली त्यांना कळालेच नाही. त्यांना येथील तरुणांनी बाहेर काढले. आगीमुळे त्यांच्या हाताला व डोक्याला भाजले. त्यांचे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर मुरलीधर देवजी भिकुले यांचे घरदेखील आगीने भस्मसात झाले आहे. त्यांच्या घरात दोनशे किलो तांदूळ, गहू, घरगुती साहित्य पाच तोळे सोने आणि २२ हजार रुपये रोख आगीत भस्मसात झाले आहे. त्यांचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. परशुराम सदू काटकर यांचेदखील घर आगीने भस्मसात झाले आहे. त्यांच्या घरात दोनशे किलो तांदुळ, १०० किलो गहू आणि इतर धान्य, घरातील साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार वेल्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी आग लागल्याने आग विझविण्यासाठी येथील तरुणांना मोठी कसरत करावी लागली. रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेली आगीला विझविण्यासाठी रात्रीचे तीन वाजले होते.

४अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले होते. परंतु, पुण्याहून गाडी येण्यास दीड ते दोन तास वेळ लागला. तोपर्यंत आगीत सर्वकाही भस्मसात झाले होते. अग्निशामक दल केवळ पुणे शहरातच आहे. पुणे-सातारा रस्त्यावर अग्निशामक दलाचा एखादा विभागही नाही. त्यामुळे अतिदुर्गम अशा वेल्हे तालुक्यात अग्निशामक दलाची एक गाडी मिळावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संतोष अप्पा दसवडकर यांनी
केली आहे.

४ वेल्हेच्या सभापती संगीता जेधे, वेल्ह्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जेधे यांनी भेट दिली व घटनेच्या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. येथील तीनही कुटुंबे रस्त्यावर आली असून या कुटुंबांना तातडीचे मदत मिळावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
 

Web Title: Due to the short circuit, three houses were destroyed in Vitthalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.