‘सिग्नल तोडण्या’च्या अतिघाईमुळे जीव टांगणीला

By admin | Published: March 20, 2017 04:46 AM2017-03-20T04:46:31+5:302017-03-20T04:46:31+5:30

चौकात पोलीस असेल तरच सिग्नलची शिस्त पाळायची, नसेल तर काही क्षण थांबून सुसाट वाहने दामटायची, अशा अतिघाईत

Due to the overwhelming response of 'signal breakdown', it is said that the postponement of life | ‘सिग्नल तोडण्या’च्या अतिघाईमुळे जीव टांगणीला

‘सिग्नल तोडण्या’च्या अतिघाईमुळे जीव टांगणीला

Next

पुणे : चौकात पोलीस असेल तरच सिग्नलची शिस्त पाळायची, नसेल तर काही क्षण थांबून सुसाट वाहने दामटायची, अशा अतिघाईत असलेल्या वाहनचालकांच्या घातक सवयीमुळे पादचारी आणि अन्य दिशेने येणाऱ्या वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.
शहरातील बहुसंख्य चौकांमध्ये ही स्थिती असून सिग्नल ’तोडण्याच्या’ सवयीची लागण काही जणांना होत असली, तरी अनेक जण हिरवा दिवा लागेपर्यंत संयम पाळत असल्याचे संमिश्र चित्रही असल्याने जिवाच्या धोक्याची जाणीव बहुसंख्यांना होऊ लागली आहे.
४पुण्यात स्वयंचलित सिग्नलची सुविधा निर्माण होऊन अनेक वर्षे उलटली. स्वयंचलित सिग्नलची सुविधा होण्यापूर्वी चौकात थांबलेले वाहतूक पोलीस नियमन करत असत. त्या वेळी वाहनांची संख्या कमी असल्याने आणि पोलिसांचा धाक असल्याने पोलिसाच्या आदेशाकडे सहसा दुर्लक्ष केले जात नसे. वाढती वाहनसंख्या आणि कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर सिग्नलची सुविधा निर्माण केली गेली. लाल दिवा लागलेला असल्यास वाहन थांबवून पादचाऱ्यांना, पलीकडून जाणाऱ्या वाहनांना जाऊ देण्याची खूण सर्व दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकीस्वारांना ओळखीची झाली आहे. मात्र, अतिघाईत असलेले वाहनचालक ’सिग्नल तोडून’ सुसाट वेगाने पसार होत असल्याने रस्ता ओलांडणारे पादचारी, अन्य वाहने यांची त्रेधा उडून अपघात होत असल्याचे चित्र आहे.
सकाळी साडेनऊ ते दुपारी १ तसेच सायंकाळी ५ ते रात्री९ गजबजलेल्या, मोठ्या चौकांमध्ये पोलीस नसले तरी वेगाने जाणाऱ्या प्रचंड वाहनसंख्येमुळे सिग्नल तोडण्याची हिंमत सहसा केली जात नाही. डेक्कन जिमखान्यावरील खंडुजीबाबा चौक, अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौक, स्वारगेटजवळील जेधे चौक, वेधशाळेजवळील खुडे चौक, संचेती रुग्णालयाजवळील चौक, झाशीची राणी पुतळ्याजवळील चौक, स. प. महाविद्यालयाजवळील चौक, गाडीतळाजवळील चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौक, दांडेकर पुलाजवळील तसेच सेनादत्त पोलीस चौकीजवळील चौक, दशभुजा गणपती व नळस्टॉपजवळील चौक, कर्वे पुतळ्याजवळील चौक, अप्पा बळवंत चौक, शनिपाराजवळील चौक अशा सतत गजबजलेल्या चौकांमध्ये सिग्नलची शिस्त सहसा पाळली जाते.
तुलनेने कमी वर्दळ असलेल्या चौकांमध्ये, अरुंद रस्त्यावरील तसेच अवजड वाहतूक फारशी नसलेल्या ठिकाणी सिग्नल तोडण्याची घाई वेगवान वाहने असलेले युवक प्रामुख्याने करतात. काही चौकांमध्ये तरुणांच्या बरोबरीने महिला, ज्येष्ठ, रिक्षाचालक, बसचालक, दुचाकीस्वार अशा सर्व वाहनचालकांना विशिष्ट चौकांमध्ये
सिग्नल तोडण्याची सवय झालेली आहे.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेजवळील चौक, यशवंतराव चव्हाण पूल ते कर्वे रस्त्यावरील गरवारे शाळा, राजाराम पुलाजवळील चौक अशी काही बेशिस्त वाहनचालकांची नेहमीची ठिकाणे आहेत.
पोलिसांनी महिनोन्महिने कारवाई केल्यानंतर स्थानिक वाहनचालक पोलिसांचा अभाव असतानाही सिग्नल पाळताना दिसतात. काही ठिकाणी सरळ रस्ता आणि डावीकडे जाणारा फाटा असेल तर डावीकडे जाण्यासाठी हिरवा सिग्नल नसतानाही घुसखोर व अतिघाईतील वाहनचालक वाहने दामटतात. त्यामुळे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची स्वत:चा बचाव करत वाहने चालविण्याची कसरत होते.

Web Title: Due to the overwhelming response of 'signal breakdown', it is said that the postponement of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.