दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:05 AM2018-11-01T02:05:41+5:302018-11-01T02:06:11+5:30

पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

Due to drought, farmers are fed up | दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

Next

दावडी : पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळात तेरावा महिना उजाडल्याचे त्याला वाटत आहे.

पुर्व भागातील गाडकवाडी, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी ओळख म्हणजे अवर्षण ग्रस्त गावे. उद्योगधंदा काहीच नाही, त्यामुळे हाताला काम नाही. सगळी मदार शेतीवर. मात्र निसर्गाच्या फेऱ्याने हीच शेती शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. गतवर्षीचे संकट झटकून नव्या उमेदीने कामाला लागायचे. कर्ज, उसनवारी करून पैसा शेतीत ओतायचा, मात्र लहरी निसर्गाच्या लहरीपणाने मेहनतीवर पाणीच ओतायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. परतीचा पाऊसही न झाल्याने विहिरी, तळी, बंधारे यांनी तळ गाठला आहे.

सरकारी आस्थेचाही दुष्काळ नशिबी
भयानक परिस्थिती असतानाही खेड तालुका दुष्काळसदृश घोषित केला नाही. जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी दहा तालुके दुष्काळसदृश घोषित केले आहे. त्यापैकी खेड तालुका मात्र दुष्काळग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले नाही. दुष्काळ देखरेख समिती व खेड कृषी विभागातील यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जनतेच्या मनातील उद्विग्नता वाढत आहे.

जून महिन्यात जोरदार पावसानंतर खरीप हंगामातील बटाटा व इतर पिकांची पेरणी झाली. ही पिके कशीबशी निघून आली मात्र उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बी हंगामासाठी पाऊस नसल्यामुळे ज्वारी व इतर पिकांची पेरणी केली नाही. पाऊस नसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी पिकांना पाणी दिले आहे.

काही ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनावर पिके जगवण्याची धावपळ करताना दिसत आहेत. मात्र मुळातच विहिरीतच पाणी नसल्याने ही धावपळ तरी शेवटपर्यंत कामी येईल का अशी परिस्टिती आहे. भारी जमिनीत ओल असल्याने पिके उभी आहेत. हलक्या जमिनीतील पिके जळाली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.

मोजक्याच गावामध्ये स्थिती समाधानकारक असली लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. पाणी आणि चारा दोघांचाही प्रचंड दुष्काळ आहे. जनावरं सांभाळता येत नसल्यानं शेतकरी त्यांना बाजारात विक्रीला आणतोय. मात्र तिथंही भाव मिळत नसल्यानं जनावरं मातीमोल भावात विकावी लागत आहेत.

Web Title: Due to drought, farmers are fed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.