ठळक मुद्देशेजारच्यांनी घरी आलेल्या मुलीच्या अंगावर व्रण पाहिल्यानंतर प्रकार उजेडातमुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर हडपसर पोलिसांकडून महिलेला अटक

पुणे : मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजारच्यांनी घरी आलेल्या मुलीच्या अंगावर व्रण पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. हडपसर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. 
सोनी संतोष शेट्टी (रा. गोंधळेनगर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी या चिमुरडीच्या शेजारी राहणार्‍या रजनीश तिवारी (वय २८, रा.गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळेनगर परिसरात राहाणारे शेट्टी कुटुंब कामगार आहेत. या परिसरात कुटुंबाने काही खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. शेजारी राहाणा-यांकडे  चिमुरडी सातत्याने यायची-जायची. नेहमीप्रमाणे शुक्रवारी चिमुरडी आली असता फिर्यादींना तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. त्यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून या चिमुरडीला चटके देण्यात आले, शिवाय तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत होत्या. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली.