Dr. Kalam's humility best: Suresh Naik; book publication on abdul kalam | डॉ. कलाम यांची विनम्रता सर्वश्रेष्ठ : सुरेश नाईक; ‘असे घडले डॉ. कलाम’ पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. कलाम यांची विनम्रता सर्वश्रेष्ठ : सुरेश नाईक; ‘असे घडले डॉ. कलाम’ पुस्तकाचे प्रकाशन

ठळक मुद्देकलामांच्या अंगी असलेले विनम्रता, साधेपणा हे गुण वाखाणण्याजोगे : सुरेश नाईक ‘असे घडले डॉ. कलाम’, दीपक चैतन्य लिखित ‘पिंट्यांची धमाल गाणी’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : ‘‘क्षेपणास्त्रांच्या निर्मितीपासून ते चाचणी यशस्वी होईपर्यंत कलामांना विविध प्रकारची अग्निदिव्ये पार करावी लागत असत. त्या काळात ते अहोरात्र आपल्या कामात मग्न असायचे. तसेच काही वेळा त्यांना वरिष्ठांच्या रागालाही सामोरे जावे लागे. परंतु, त्यांच्याकडे एक विलक्षण गुण होता, जो त्यांच्या यशाचे गमक आहे.’’ इस्त्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी अनेक रोमांचकारी व अनुकरणीय प्रसंगांतून ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे कलाम यांच्या यशार्थ जीवनाचे रहस्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. 
डॉ. नंदा हरम लिखित आणि विद्यानंद प्रकाशनच्या ‘असे घडले डॉ. कलाम’ आणि दीपक चैतन्य लिखित ‘पिंट्यांची धमाल गाणी’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते औंधच्या सिंध विद्या भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कलामांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांतून त्यांच्या सर्वश्रेष्ठ आदरयुक्त व्यक्तित्वाचे दर्शन घडविले. 
या वेळी कर्नल विक्रम अडवाणी, गौतम फेरवानी, डेक्कन कॉलेजच्या डिक्शनरीचे संपादक डॉ. प्रसाद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे  प्रमुख डॉ. रवींद्र मुळे, लायन्स क्लब कोथरूडचे अध्यक्ष नागेश चव्हाण, अ‍ॅस्कॉपचे अध्यक्ष डॉ. आर. टी. वझरकर तसेच विद्यानंद प्रकाशनचे किशोर खुर्जेकर उपस्थित होते. 
नाईक म्हणाले, की कॉलेजमध्ये प्रोजेक्टसाठी गाईडने दिलेली तीन दिवसांची मुदत पूर्ण करताना कलामांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत, त्यातून शिकलेला वेळेच्या नियोजनाचा धडा, एसएलव्ही ३ या संपूर्ण देशी बनावटीच्या रॉकेटच्या अपयशानंतर उठलेली टीकेची झोड ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारत पुढील वर्षी दमदार यशस्वी चाचणी करून दाखवली. त्यांचे संघटनकौशल्य, नेतृत्व, लहान मोठ्यांना समजून घेण्याची वृत्ती, समजावण्याची पद्धत समोरच्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पाडणारी व एक मित्रत्वाचे नाते निर्माण करणारी अशी होती. 
संध्या शेवडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.  

दहा वर्षांचा कामाचा अनुभव अविस्मरणीय 
कलाम शाळेत असताना पक्ष्यांच्या उड्डाणाविषयी त्यांना अय्यर सर शिकवत होते. छोट्या अब्दुल्लच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव ओळखत अय्यर सरांनी सर्व विद्यार्थ्यांनाच समुद्रकिनारी नेत, पक्ष्यांचे उड्डाण कसे होते, उडताना दिशा कशा बदलतात, याविषयीची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह दिली. 
या प्रसंगानंतर त्यांनी जीवनात विज्ञानाच्या क्षेत्रातच काम करायचे, असे ठरवले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. दहा वर्षांचा त्यांच्या कामाचा अनुभव अविस्मरणीय असा होता. कलामांच्या अंगी असलेले विनम्रता, साधेपणा हे गुण वाखाणण्याजोगे होते. अशा विविध प्रसंगांतून कलामांची स्वभाववैशिष्ट्ये सांगितली.


Web Title: Dr. Kalam's humility best: Suresh Naik; book publication on abdul kalam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.