रुंदीकरणासाठीची खोदाई धोकादायक

By admin | Published: May 30, 2017 02:29 AM2017-05-30T02:29:30+5:302017-05-30T02:29:30+5:30

संत तुकाराममहाराज पालखी सोहळा अवघ्या १७ दिवसांनी मार्गस्थ होणार असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत पालखी मार्गालगतचा

Dosing for widening is dangerous | रुंदीकरणासाठीची खोदाई धोकादायक

रुंदीकरणासाठीची खोदाई धोकादायक

Next

देवराम भेगडे /लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : संत तुकाराममहाराज पालखी सोहळा अवघ्या १७ दिवसांनी मार्गस्थ होणार असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत पालखी मार्गालगतचा कचरा उचलणे, स्वच्छता विषयक कामे करणे व झाडेझुडपे छाटणीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पालखीमार्गावर विविध समस्या दिसत असल्याने वारकऱ्यांची वाट अधिकच बिकट होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. देहूरोड ते निगडीदरम्यानच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, खोदलेले मोठे धोकादायक चर व खड्ड्यांमुळे वारकऱ्यांची वाटचाल असुरक्षित होणार असल्याने खोदलेल्या भागातील रस्ता तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदारास आदेश देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पालखीमार्गावर माळवाडीनजीक देहूरोड बोर्डाची हद्द सुरू झाल्यावर दहा ते पंधरा मीटर अंतरापासून झेंडेमळा येथील जकात नाक्यापर्यंत विविध ठिकाणी रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग पडले आहेत. माळवाडी ते झेंडेमळा रस्ता दीड पदरी असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडेझुडपे वाढली आहेत. माळवाडी ते झेंडेमळा येथील बोर्डाच्या जकात नाका दरम्यान झाडांची छाटणी करण्याची गरज आहे. झेंडेमळा ते सीओडी डेपोदरम्यान, स्वच्छता आहे. डेपोच्यानजीक बोर्डाने बांधलेल्या पादचारी मार्गावर पडलेले बाभळीचे झाड हटविण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. या भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडाझुडपांची छाटणी केलेली नाही. झेंडेमळा हद्दीत तसेच सीओडी प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत .
पहिल्या विसाव्याला होणार गैरसोय
संत तुकाराममहाराजांच्या पालखीचा चिंचोली येथील पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर काही ठिकाणी एका ठेकेदाराने इंटरनेटची भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदलेले मोठे चर अद्यापही बुजविलेले नाहीत. त्यामुळे आषाढी वारीतील वारकऱ्यांची चिंचोलीतील पहिल्याच विसाव्याला मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. लांबलचक चरामुळे चिंचोली, किन्हई , झेंडेमळा, काळोखेमळा, जाधवमळा, हगवणेमळा व पंचक्रोशीतून पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होणार आहे. चरात पडून अपघात होण्याची भीतीही आहे. परिसरात खोदकामाचा राडारोडा पसरला आहे. लाखो वारकरी थांबत असल्याने परिसर सफाई करण्याची गरज आहे. चिंचोली शनिमंदिर ते अशोकनगरदरम्यान झाडा-झुडपांची छाटणी करण्याची गरज आहे.

धोकादायक गतिरोधक : वाटचाल असुरक्षित

पालखीमार्गावर कॅन्टोन्मेंट हद्दीत लष्करच्या ताब्यातील झेंडेमळा ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्यावर दहा गतिरोधक असून, सर्व गतिरोधक निकषानुसार बनविलेले नाहीत. गतिरोधकांच्या अगोदर पुढे गतिरोधक असल्याचा फलक कोठेही नाही. काही गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत तर काहींचे पुसट झाले आहेत. रात्री गतिरोधक दिसत नाहीत. मुख्य रस्ता व संरक्षक बाजूपट्टी यातील अंतर अधिक असल्याने चालतानाही अपघाताची शक्यता आहे.
मुंबई-पुणे महामार्गाचे देहूरोड ते निगडीदरम्यान रुंदीकरण सुरू आहे. काही दिवसांपासून काम संथगतीने सुरू आहे. केंद्रीय विद्यालयाजवळ एकाच ठिकाणी काम सुरू आहे. रुंदीकरणात टाकण्यासाठी आणलेल्या जलवाहिन्या रस्त्यालगत पडून आहेत. देहू फाटा भागात विविध लष्करी आस्थापना व कॅन्टोन्मेन्टच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते. त्या ठिकाणीच मोठे चर खोदलेले आहेत. देहूफाटा ते केंद्रीय विद्यालय क्रमांक एक दरम्यान विविध ठिकाणी महामार्गावर आडवे चर खोदल्यानंतर व्यवस्थित बुजविलेले नाहीत.
केंद्रीय विद्यालयापासून निगडीतील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या व्यवस्थापन केंद्रापर्यंत काही ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत तयार केला आहे. काही ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले असतानाही काम बंद असल्याचे दिसून आले. खोदकाम करताना मूळ रस्त्यालगत लांबलचक चर खोदले असून वारकऱ्यांना चालताना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. चालताना ते पाय घसरून चरात पडण्याची शक्यता आहे. अर्धवट काम झालेल्या भागात चालताना अडथळे निर्माण झालेले आहेत.

देहूरोडकडून निगडीकडे पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना वारकरी मुख्य महामार्गासह डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेतून चालत असतात. डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेत खोदकाम केलेले असल्याने यावर्षी वारकऱ्यांना व्यवस्थित चालता येणार नसून मोठी गैरसोय होणार आहे. काही भागात अर्धवट तयार केलेला रस्ता तसेच बहुतांशी खोदलेल्या भागावर संबंधित ठेकेदाराने लक्ष केंद्रित करून याच भागातील कामे तातडीने पूर्ण करणे शक्य आहे. आगामी पंधरा दिवसांत इतर भागात व महामार्गाच्या उजव्या बाजूला सुरू असलेली कामे पूर्ण बंद ठेवून सर्व कामगार प्राधान्याने या भागातील कामांवर लावून कामे अधिकाधिक कामे पूर्ण केल्यास वारकऱ्यांची गैरसोय काही प्रमाणात कमी होऊ शकते.
- दत्तात्रय तरस, विश्वस्थ, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाज (हवेली)

Web Title: Dosing for widening is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.