The donkey market is worth 2 crores, Pusanima travels in Jejuri | गाढवांचा बाजार २ कोटींवर, जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा

जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरवर्षी पौष पौर्णिमेला जेजूरीत मोठी यात्रा भरते. वैदू, कोल्हाटी, बेलदार, कैकाडी, वादारी, कुंभार, डोंबारी, परीट, पाथरवट, गारुडी आदी जाती-जमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजूरीत आले आहेत. या जाती जमातीतील अनेक लोकांचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे. माती, विटा, वाळू, डोंगर पठारावर ओझी वाहून नेहण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. दरवर्षी तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत कुलदैवताच्या दर्शन बरोबरच गाढवांचा खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने लोक येतात.
आधुनिक यंत्रयुगात वाहनाचा वापर वाढल्याने गाढवाच्या पाठीवरील ओझे कमी झाले आहे व त्यामुळे गाढवांच्या बाजाराला दिवसेंदिवस उतरती कळा सुरु झाली आहे. जेजुरीत काल रविवार (दि ३१) पासून बंगाली पटांगणात गाढवाच्या बाजाराला सुरुवात झाली. येथे जागा कमी पडत असल्याने पालखी तळावर ही बाजार भरलेला होता.
या बाजारासाठी गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या बरोबरच राज्यातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, जालना, नांदेड आदी भागातून व्यापारी तसेच विविध जाती-जमातीचे लोक या बाजारात सहभागी झाले होते.
गाढव खरेदी करताना त्याचे दात व वय पाहिले जात होते. दोन दाताचा दुवान, चार दाताचा चवान, कोरा अखंड अशी निवड करून गाढवांची किं मत ठरवली जात होती. गावठी गाढवांना पाच हजारापासून किंमत मिळाली तर गुजरातमधील काटेवाडी गाढवांना सुमारे पंधरा ते तीस हजार रुपयापर्यंत किंमत मिळाली. या बाजारात दोन अधिक गाढवांची विक्री होऊन दोन कोटींवर रुपायांची उलाढाल झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले. गाढवाबरोबरच धनगरी घोड्यांचाही बाजार येथे भरला होता. सुमारे पन्नास घोडे विक्रीसाठी आले होते.