डॉक्टर्स डे विशेष : निष्णात डॉक्टर आणि अद्ययावत रुग्णालयांमुळे पुणे ठरतेय मेडिकल हब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 12:39 PM2019-07-01T12:39:36+5:302019-07-01T12:59:54+5:30

वैद्यकीय उपचार हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याशी निकटचा संबंध असलेला घटक आहे.

Doctor's Day Special: Pune is Medical hub due to intelligent doctor and updated hospitals | डॉक्टर्स डे विशेष : निष्णात डॉक्टर आणि अद्ययावत रुग्णालयांमुळे पुणे ठरतेय मेडिकल हब

डॉक्टर्स डे विशेष : निष्णात डॉक्टर आणि अद्ययावत रुग्णालयांमुळे पुणे ठरतेय मेडिकल हब

googlenewsNext
ठळक मुद्देअद्ययावत उपचार : पोषक वातावरण, डॉक्टर-रुग्ण संबंध यांचा परिणामप्रशिक्षित शहरातील सुमारे ५० रुग्णालयांना एनएबीएच मानांकन धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणीकृत असल्यामुळे गरीब रुग्णांना माफक दरात उपचार देणे शक्य

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : आरोग्यास पोषक वातावरण, वैद्यकीय सुविधांची उपलब्धता, इतर शहरांच्या तुलनेत कमी दर, अद्ययावत तंत्रज्ञान आणि साधनसामग्री यामुळे शहराने आता मेडिकल हब म्हणून नवी ओळख मिळवली आहे. पुण्यातील बहुतांश रुग्णालये धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणीकृत असल्यामुळे गरीब रुग्णांना माफक दरात उपचार देणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे, आयएमएतर्फे प्रशिक्षित शहरातील सुमारे ५० रुग्णालयांना एनएबीएच मानांकनही नुकतेच मिळाले आहे.

इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील वैद्यकीय उपचारांचे दर ३०-४० टक्क्यांनी कमी असल्याने जपान, अमेरिका, इंग्लंड, इटली अशा विविध देशांतील रुग्ण पुण्यात येत असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.
वैद्यकीय उपचार हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याशी निकटचा संबंध असलेला घटक आहे. आरोग्याशी संबंधित तक्रारी सुलभतेने दूर व्हाव्यात, माफक दरात चांगल्या दर्जाचे औषधोपचार मिळावेत, रुग्णांना चांगली वागणूक मिळावी, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर-रुग्ण संबंधही मोलाची भूमिका बजावतात. पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात छोटे दवाखाने, तसेच रुग्णालयांची संख्या वाढली आहे. रुग्णालयांमध्ये निष्णात डॉक्टरांची टीम, अद्ययावत साधनसामग्री यामुळे चांगल्या दर्जाचे उपचार मिळणे शक्य होते. पुण्यातील विमान, रेल्वे, बस ही वाहतूक व्यवस्थाही तत्पर असल्याने बाहेरील राज्यातून, तसेच देशातून येणा-या नागरिकांची सोय होते. उपचारांसाठी पोषक वातावरण, वाहतूक व्यवस्था, अद्ययावत उपचारपध्दती, डॉक्टर-रुग्ण संबंध अशा विविध बाबींमुळे पुणे मेडिकल हब म्हणून नावारुपाला येत आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

वैद्यकीय संशोधनात भरारी गरजेची
आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत पुण्याने भरारी घेतली आहे. वैद्यकीय संशोधनात मात्र शहरामध्ये अद्याप सकारात्मक चित्र पहायला मिळत नाही. योग्य धोरणे, अनुदान आदींच्या बाबतीत उदासिनता असल्यने वैद्यकीय संशोधनाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही. हे चित्र बदलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

----------
वैद्यकीय क्षेत्राला आता मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरुप आले आहे. विशेषत:, मोठ्या शहरांमध्ये ही व्यावसायिकता जास्त अधोरेखित होते. मात्र, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद अशा शहरांच्या तुलनेत व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन डॉक्टर-रुग्ण संबंध आजही टिकून आहेत. दोन्हीकडून चांगल्या पध्दतीने संवाद होतो. पुण्यातील वैद्यकीय उपचारांचे दर इतर शहरांच्या तुलनेत ३०-४० टक्कयांनी कमी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार परवडण्याजोगे असतात. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पुण्यामध्ये सव्वा ते दीड लाख रुपये खर्च येत असेल, तर इतर शहरांमध्ये तो खर्च दोन-अडीच लाखांपर्यंत जातो. ओमान, इटली, अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांतून रुग्ण उपचारांसाठी पुण्यात येतात.
- डॉ.के.एच.संचेती, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ
-----------
जागतिकीकरणामुळे पुणे सर्व राज्यांशी, शहरांशी जोडले गेले आहे. पुण्यातील नागरिकांचे वैद्यकीय क्षेत्राबाबतचे अनुभव चांगले असल्यामुळे देशा-परदेशातील नागरिकांपर्यंत ही ख्याती पोहोचली आहे. पुण्यातील डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करताना दिसतात. अद्ययावत तंत्रज्ञान विकत घेता येते, मात्र, अद्ययावत ज्ञान सर्वत्र असतेच, असे नाही. याबाबतीत पुण्याने कायमच बाजी मारली आहे.
- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय तज्ज्ञ
...........
पुण्यामध्ये प्राचीन वैद्यकीय उपचार आणि आधुनिक उपचारपध्दती यांचा संगम पहायला मिळतो. निष्णात डॉक्टर आणि अद्ययावत रुग्णालये ही पुण्याची जमेची बाजू आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे २०० रुग्णालयांना एनएबीएच नामांकनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ५० रुग्णालयांना मानांकन मिळाले असून, १२५ रुग्णालये तपासणी प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. 
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, आयएमए
......

Web Title: Doctor's Day Special: Pune is Medical hub due to intelligent doctor and updated hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.