तंत्रज्ञानाला गुरू मानण्याची गल्लत नको- महेश काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:14 AM2018-07-28T04:14:35+5:302018-07-28T04:15:08+5:30

आयुष्यात स्पर्धा हा मैलाचा दगड असावा; ध्येय नव्हे, असे ते म्हणाले.

Do not miss technology to be a guru - Mahesh Kale | तंत्रज्ञानाला गुरू मानण्याची गल्लत नको- महेश काळे

तंत्रज्ञानाला गुरू मानण्याची गल्लत नको- महेश काळे

googlenewsNext

पुणे : शास्त्रीय संगीत जीवनातील निर्व्याज आनंद बहाल करते. कला हा भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. संगीताचे धडे गिरवताना रियाज हा साधनेच्या प्रवासातील पहिला पैलू असतो. साधना ही भक्ती असून, त्यातून स्वरांच्या ब्रह्मांडामध्ये विहार करण्याचा निखळ आनंद मिळतो. संगीत शिकताना तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ माहितीसाठी होतो, त्याला गुरू मानण्याची गल्लत करू नये, असा सल्ला गायक महेश देशपांडे यांनी उपस्थितांना दिला. आयुष्यात स्पर्धा हा मैलाचा दगड असावा; ध्येय नव्हे, असेही ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सांस्कृतिक कट्टा या उपक्रमांतर्गत महेश काळे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी शास्त्रीय संगीतातील बारकावे, सादरीकरण, कलेचे शिक्षणातील महत्त्व, तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर प्रकाश टाकला.
काळे म्हणाले, ‘‘हल्ली गुगलवर प्रत्येक घराण्याचे गाणे ऐकायला मिळत असले तरी गुगल हा गुरू होऊ शकत नाही. प्रगत तंत्रज्ञानामुळे मी कुठूनही शिष्यांच्या संपर्कात राहू शकतो. तंत्रज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा फायदा जरूर घ्यावा; परंतु मूळ गाभा, मर्म हरवता कामा नये. ज्ञानाची प्रत्यक्ष ऊब ही गुरूसमोर बसून शिकतानाच मिळते. आपल्या अनुभवातील प्रचीतीचा पोत उंचावण्यासाठी गुरू आवश्यक असतो.’’
संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर आदी या वेळी उपस्थित होते.

रिअ‍ॅलिटी शोमधील यश पचवता आले पाहिजे
मुलांना कमी वयातच रिअ‍ॅलिटी शोमध्ये मिळालेले यश पचवता आले पाहिजे. या वेळी पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. शिक्षण सोडून मुले अर्थकारणामागे धावू लागली, तर नुकसानच अधिक होते. या स्पर्धांमध्ये आर्थिक बक्षिसाऐवजी गाण्याची संधी किंवा मान्यवर गुरूंकडे शिकण्याची संधी मिळणे या मुलांसाठी अधिक योग्य ठरेल, असे वाटते. आपली शिक्षणपद्धती ही मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी फारशी प्रोत्साहन देत नाही. संगीत, कला, प्रेम आणि सहअनुभूती ही मूल्ये प्राथमिक शिक्षणातूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबणे आज आवश्यक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सध्या गाण्यांच्या मैफलींमध्ये गायकाच्या वेषभूषा व रंगभूषेला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र, आताचा जमाना हा दृश्य माध्यमांचा आहे. त्यामुळे जोपर्यंत गाण्याचे मर्म हरवत नाही, तोपर्यंत गायकाच्या सादरीकरणावर लक्ष दिले जात असेल तर त्यात काही चूक नाही.
- महेश काळे

Web Title: Do not miss technology to be a guru - Mahesh Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे