इतिहास लेखनात उदो उदो नको; ‘चुका’ही मांडायला हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:22 AM2019-03-31T01:22:12+5:302019-03-31T01:22:24+5:30

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिर स्थापत्य तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना पुरातत्त्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

Do not blow up history; You should also say 'mistakes' | इतिहास लेखनात उदो उदो नको; ‘चुका’ही मांडायला हव्यात

इतिहास लेखनात उदो उदो नको; ‘चुका’ही मांडायला हव्यात

Next

नम्रता फडणीस

पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला. काय वाटतं?
- एवढा मोठा मानाचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल आनंद तर आहेच. विविध क्षेत्रातील इतक्या मोठ्या मंडळींना हा पुरस्कार दिला आहे, त्यांच्या पंक्तीत मला बसायला मिळाले हे माझे भाग्य समजतो.

पुण्याशी ॠणानुबंध कसे जुळले?
- माझे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पंढरपूरमध्ये झाले. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी सांगितले की, पंढरपूर सोडायचे ठरवले
आहे, तर पुण्याला जा. तिथे चांगले
शिक्षण मिळते. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. आम्ही
सगळे भाऊ स. प. मध्येच शिकलो. ‘इतिहास’ विषय घेऊन पदवी संपादन केली. त्यानंतर हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केले.
पुन्हा पीएच.डी.साठी डेक्कन कॉलेजमध्ये आलो.

पुण्यात पदवी आणि पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण झाले; मग प्रबंधाचा विषय ‘मराठवाडा संस्कृतीचा इतिहास’ हा का निवडावासा वाटला?
- त्याचे कारण म्हणजे, मी मूळचा मराठवाड्याचा. उर्वरित महाराष्ट्राचा असा समज आहे की, मराठवाडा हा मागासलेला आहे; मग मागासलेला असेल तर हा प्रारंभापासून आहे का? ते पुढे आणावे म्हणून हा विषय घेतला. गुरू म्हणाले, की तुमच्या अभ्यासाने सिद्ध झाले की तो मागासलेला आहे, तर तुम्ही ते लिहाल का? मी हो म्हटले आणि हा विषय निवडला.

‘मूर्तिशास्त्र’ हा विषय अभ्यासासाठी घेण्यामागे कोणता विचार होता?
- पुरातत्त्वाचेच ‘मंदिर स्थापत्य’, ‘मूर्तिशास्त्र’; तसेच ‘शिलालेख’ आणि ‘नाणकशास्त्र’ हे भाग आहेत. भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण हे मंदिरे आणि मूर्ती आहेत. मूर्ती कशाकरिता निर्माण झाल्या? मूर्तिपूजा ही ग्रीस, इटलीमध्ये अस्तित्वात होती. त्यांच्या संस्कृतीचे संदर्भ बदलत गेले आणि मूर्तिपूजा मागे पडली. भारतात मूर्तिपूजा आजही होते, त्याला इतके महत्त्व का आहे? हे जाणून घ्यावेसे वाटले. एखाद्या समाजाला गुणांची गरज असते, तेव्हा त्या गुणांचे समूर्तकरण करणे म्हणजे मूर्तिपूजा असते. समाज प्रबोधन आणि समाजाचे अभिसरण यासाठी मूर्तिपूजा आवश्यक असते.

मूर्तिपूजेबद्दल समाजात जी मिथ्यक आहेत, जी धारणा आहे, त्याबद्दल काय वाटते? अमूक एका मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे, असे म्हटले जाते? त्यामागची नक्की सत्यता काय आहे?
- मूर्तिबद्दल समाजात खूप मोठे गैरसमज आहेत. ३३ कोटी देव असे म्हटले जाते तेव्हा ते ३३ प्रकारचे देव आहेत. नृत्य गणपतीची मूर्ती बसवली की तो नाचवतो म्हणतात; मग ती बसवली तर तो बसवतो का? असे विचारले तर उत्तर कोणाकडेच नसते. देव भक्ताचं भलं करणारा असेल तर तो वाईट करेल का? शास्त्राच्या दृष्टीने या समजाला कोणताही आधार नाही. समाजात ज्या गोष्टी दृढ होतात त्या अपसमजामुळे झालेल्या असतात. ‘स्वार्थ लोपता’ हे त्यामागचे कारण आहे. प्राचीन काळात कुठलीच अशी बंधनं नव्हती. ॠग्वेदात विद्वान स्त्रिया पाहता त्या पुरुष विद्वानांशी वाद घालून जिंकू शकतात; मग त्यांनाच प्रवेश नाकारणे हे हास्यास्पद वाटते.

काळानुरूप इतिहासाचे संदर्भ बदलत जातात, त्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन होणे आवश्यक आहे का? सध्याची स्थिती काय आहे?
- आतापर्यंत जो इतिहास लिहिला तो परक्यांनी लिहिला. ज्या लोकांना राज्य करायचे आहे ते इतिहासांच्या साधनाद्वारे त्यांना अनुकूल होईल अशी घडण ते इतिहासाला देत असतात. आपण इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवतो, त्यामुळे इतर प्रांतापर्यंत आपल्या लोकांचे काम पोहोचत नाही. तिच साधनं असतात केवळ दृष्टिकोन बदलला पाहिजे. भारतीयांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला गेला पाहिजे.

इतिहासकार त्यांच्या सोयीने इतिहास लिहितात अशी एक टीका केली जाते? त्याबद्दल काय वाटते?
- एखाद्याने इतिहास त्रोटक साधन किंवा दृष्टिकोनातून लिहिला आहे असे जर कुणाला वाटले, तर अन्य साधनांद्वारे तो पूर्ण करता आला पाहिजे. इतिहास लिहिणाऱ्याचा दृष्टिकोन हा तसा म्हटल तर ‘पक्षपाती’ असतो; मात्र देशाला उपयुक्त ठरेल असा सर्वमान्य इतिहास लिहिला गेला पाहिजे. आपल्या काही चुका झाल्या असतील, तर त्याही लिहायला हव्यात. इतिहास हा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा असतो. चुकीच्या गोष्टीही समोर आल्या पाहिजेत.

प्राचीन संस्कृतीमधील अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या अद्यापही समोर आलेल्या नाहीत?
- महाराष्ट्राचा इतिहास ताम्रपाषाण, पुराश्म
आणि नवाश्मयुगापर्यंत पोहोचला आहे. अजूनकाही ठिकाणी उत्खनन झाली, तर महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्ध होती हे समोर येईल. राज्यात कितीतरी मंदिरे आहेत त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे. मला टागोर नॅशनल फेलोशिप मिळाली आहे त्यासाठी ‘हिस्ट्रोरिकल रिलिजिअस कल्टवाईज स्टडी महाराष्ट्र बेस्ड आॅन अनकॉमन युनिक इमेजेस’ हा विषय अभ्यासासाठी निवडला आहे. प्राचीन काळातील देवळांचा अभ्यास देखील झालेला नाही. तो व्हायला हवा. त्यातून ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या दूर होतील.

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिर स्थापत्य तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना पुरातत्त्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
 

Web Title: Do not blow up history; You should also say 'mistakes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे