एसटीच्या विभागीय कार्यालयांमध्ये  आता बारामती विभागाची भर पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 08:49 PM2018-07-14T20:49:53+5:302018-07-14T20:54:26+5:30

पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारांची संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे.

divisional offices of the ST department will now include Baramati section | एसटीच्या विभागीय कार्यालयांमध्ये  आता बारामती विभागाची भर पडणार

एसटीच्या विभागीय कार्यालयांमध्ये  आता बारामती विभागाची भर पडणार

Next
ठळक मुद्देमहामंडळाच्या वाहतुक विभागाने पुणे विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे दिली माहिती इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभागातील प्रवासी संख्याही अधिक

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) विभागीय कार्यालयांमध्ये आता बारामती विभागाची भर पडणार आहे. पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारांची संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे. त्यामुळे एकुण विभागांची संख्या ३२ होणार आहे.
एसटी महामंडळाची सध्या राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी ३१ विभागीय कार्यालये आहेत. प्रशासकीय विभागानुसार मुंबई विभागात ६, पुणे ५, नाशिक ४, औरंगाबाद ७, अमरावती ४ तर नागपूरमध्ये ५ विभाग येतात. एकुण ३१ विभागांतर्गत २४७ आगार तर ५७८ बसस्थानके आहेत. या विभागांमध्ये आता लवकरच बारामती विभागाची भर पडणार आहे. पुणे विभागामध्ये सध्या बारामती आगाराचे उत्पन्न इतर आगारांचे तुलनेत अधिक आहे. तसेच इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभागातील प्रवासी संख्याही अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पुण्यासह सातारा व सोलापूर विभागातील काही आगार वेगळे करून बारामती हा नवीन विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला पुन्हा चालना मिळाली असून संबंधित विभाग नियंत्रकांकडून याबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
महामंडळाच्या वाहतुक विभागाने पुणे विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रानुसार, बारामती येथे विभागीय कार्यालय कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी पुणे विभागातील बारामती, बारामती एमआयडीसी, दौंड, इंदापूर, शिरूर, सोलापूर विभागातील करमाळा व अकलूज तर सातारा विभागातील फलटण असे एकुण ८ आगार प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे विभागात सध्या १२, सोलापुर ९ तर सातारा विभागात ११ आगार आहेत. याअनुषंगाने संबंधित आगारांचा नफा-तोटा, चलनीय तसेच भौगोलिक, राजकीय व प्रशासकीय परिस्थितीची माहिती, नवीन विभाग निर्मितीसाठी आवश्यक निकषांवर आधारित मत तसेच सातारा व सोलापूर विभागांची माहिती संकलित करावी, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------
बारामती विभागासाठी प्रस्तावित आगार - बारामती, बारामती एमआयडीसी, दौंड, इंदापूर, शिरूर, करमाळा, अकलूज, फलटण.
----------
एसटीची सद्यस्थिती -
विभाग - ३१
आगार - २४७
बसस्थानके - ५७८
-----------------
बारामती विभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे समजते. त्यावर विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. मात्र, याबाबतचे पत्र अद्याप मिळालेले नाही. 
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक
पुणे विभाग

Web Title: divisional offices of the ST department will now include Baramati section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.