Disruption of vehicles in Bibweedwadi, dispute between two groups | बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड , दोन गटांत वाद

महर्षीनगर : बिबवेवाडी गावठाणात दोन गटांमधील वादातून तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. यामध्ये भाऊद्दीन अन्सारी यांची होंडा सिटी, प्रताप शिळीमकर यांची फॉर्च्युनर गाडी, यशवंत जगताप यांची इंडिगो या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. घटनेमुळे बिबवेवाडी गावात दहशतीचे निर्माण झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत.
यासंर्दभात प्रताप शिळीमकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून, घटनेचा तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनार यांनी सांगितले. बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून तरूणांमध्ये गटबाजी निर्माण होत आहे.
आपल्या गटाचे वर्चस्व दाखविण्यासाठी बिबवेवाडी परिसरातील इतर भागातील मुलांना बोलवून गट निर्माण केले जात आहेत. या सर्व प्रकारांतून काही महिन्यांपूर्वी दोन गटांत हाणामारी होऊन एका तरूणावर कोयत्याने वार झाले होते. या घटनेमुळे या तरूणांमधील गटबाजी अधिकच उफाळून आली, असे स्थानिकांनी सांगितले. या गटबाजीतून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व अशा टोळक्यांवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून कठोर कारवाई करावी , अशी नागरीकांची मागणी आहे.
बिबवेवाडी गावठाणाच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर वर्दळ कमी असल्यामुळे अशा टोळक्या या रस्त्याचा आश्रय घेऊन, मद्यपान करून गैरप्रकार करत असतात.