Dangerous canals! | धोकादायक कालवे!
धोकादायक कालवे!

धोमबलकवडी कालवा : अस्तरीकरण अपूर्ण; चार बळी गेले तरी पाटबंधारे झोपलेलेच

भोर -वाई तालुक्यातील धोमबलकवडी धरणाचा उजवा कालवा भोर तालुक्यातील ९ गावांतून जातो. मात्र येण्या-जाण्यास पुलाची सुविधा नाही, पाण्यात उतरण्यास घाट, संरक्षक कठडे नाहीत, बोगद्याच्या तोंडावर जाळी नाही, अस्तरीकरणाचे काम अपूर्ण त्यामुळे गळती होऊन पिकांचे नुकसान होते. या परिस्थितीमुळे तीन-चार वर्षांत ४ ते ५ नागरिक आणि ३ ते ४ जनावरे वाहून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र याकडे वाई पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
सातारा जिल्हातील वाई तालुक्यात कृष्णा नदीवर बलकवडी गावाजवळ सुमारे ८४८ कोटी रुपये धोमबलकवडी प्रकल्प झाला असून ४.०८ टीएमसी पाणी अडवले आहे. १९९६ मध्ये धरणाच्या उजव्या कालव्याला मान्यता मिळाली आणि १९९७ साली कामाला सुरुवात झाली. ३३१५ मीटर लांबीचा पहिला बोगदा धोंडेवाडीजवळ तर कर्नावडजवळ ३२५६ मीटर लांबीचा दुसरा बोगदा. नेरे गावाजवळ ५०० मीटर लांबीचा तिसरा, खानापूरजवळ ५०० मीटरचा चौथा तर कान्हवडीजवळ १९९० मीटरचा पाचव्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर डावा कालवा चिखलगाव ते अंगसुळे असा असून अदयाप सदरचे काम अपूर्णच आहे.
भोर तालुक्यातील ६७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अस्तरीकरणाचे काम झाले नाही. त्यामुळे कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. नवीन पिके घेता येत नाहीत. शिवाय नियोजनाच्या अभावामुळे वेळेवर पाणी सोडले जात नसल्याने पिके वाळून जात आहेत. अनेक गावांजवळ कालव्यावरून जाण्या-येण्यास पुल नाहीत. संरक्षक कठडे नाहीत. पाण्यात उतरण्यास घाट नाहीत, सूचनाफलक लावलेले नाहीत.

नेरे गावाजवळ नेरे ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ५०० मीटरचा बोगदा असून तोंडावर जाळी लावलेली नाही. येण्या-जाण्यासाठी पुलाची गरज आहे; मात्र पुलाचे काम झालेले नसल्याने शेतकºयांची मोठी अडचण होत आहे. शिवाय बोगदा सुरू होतो, त्या ठिकाणी ओढा आहे. सदर ओढ्यावरून नवीन पुलावरुन पाणी वाहून बोगद्यात सोडले आहे तर पावसाचे पाणी पुलाखालून जाते. पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे बोगद्याला आणि आजूबाजूच्या शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत सात वर्षांपासून वारंवार मागणी करूनही गाळ काढला नसल्याचे नेरे गावचे माजी सरपंच प्रकाश मैद यांनी सांगितले.


डिंभेच्या कालव्यांना पाणीगळतीचे ग्रहण : गळतीमुळे जमिनीही झाल्या नापीक

डिंभे : धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांना पाणीगळतीचे ग्रहण लागले आहे. पाणीगळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. दर वर्षी कालवाफुटीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी कालव्यांचे अस्तरीकरण उखडल्याने धरणाचे कालवे धोकादायक झाले असून, कालव्याखालच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तर, सततच्या पाणीगळतीमुळे शेकडो एकर क्षेत्र नापीक झाले आहे.
डिंभे धरणातून डाव्या कालव्याद्वारे नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि उजव्या कालव्यातून आंबेगाव तालुक्यासह शिरूर तालुक्याला पाणीपुरवठा
केला जातो.
सध्या या धरणाच्या कालव्यातून जवळपास चार हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होेते. धरणाचा कालव्यातून पाणी सुरू होताच या कालव्यांतून अनेक ठिकाणी पाणीगळती होऊन अक्षरश: डिंभे धरणाच्या खालच्या बाजूला ३० ते ४० कि.मी.पर्यंत पावसाळ्यासारखे धबधबे वाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळते.
धरणापासून पुढे शिनोली गावाच्या अलीकडे उजवा कालवा सुरू होत असून, या डाव्या व उजव्या कालव्यांचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण उखडले असल्याचे पाहावयास मिळते. अनेक ठिकाणी मातीचा भराव खचून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी गिरवली गावाजवळ डाव्या कालव्याला भगदाड पडून कालवाफुटीची घटना घडली. दोन वर्षांपूर्वी कानसे तसेच महाळुंगे गावाजवळ कालवाफुटीच्या घटना घडल्या होत्या.
]अनेक वर्र्षांपासून या कालव्यांच्या डागडुजीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली जात आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने या कालव्यांची डागडुजी होत नाही.
धरणापासून जवळ असलेल्या महाळुंगे गावाला सध्या कालवागळतीचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या गावाच्या वरील बाजूने कालवा जात असल्याने वर्षातील बाराही महिने येथे दलदल असते. संपूर्ण गावाचा परिसरच दलदलमय झाल्याने येथील परिसर धोकादायक झाला आहे.

गेल्या वर्षी या गावातील नागरिकांनी पाणी सोडू न देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी दोन महिन्यांत कालवा दुरुस्त केला जाईल, असे सांगितले होते. त्याला वर्ष झाले.
कालवागळतीमुळे जमिनी दलदलमय झाल्या असून, त्या कधीही सरकण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, खालच्या बाजूला राहणाºया ग्रामस्थांना कालवाफुटीची भीती निर्माण झाली आहे.
सततच्या दलदलीमुळे शेकडो एकर क्षेत्र नापीक झाले असून, पाणी असूनही शेती पिकविता येत नसल्याच्या दुहेरी स्थितीत शेतकरी सापडला आहे. महाळुंगकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

एकीकडे पाणीच पाणी, दुसरीकडे टंचाई

एकीकडे धरणाच्या आतील गावांत तीव्र पाणीटंचार्ई असतानाच या कालव्याच्या गळतीमुळे धरणाच्या खालील गावांत अनेक ठिकाणी पाण्याचे ओहळ वाहताना दिसतात. एकीकडे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागांतील ही विसंगती आहे. अनेकदा प्रयत्न करूनही या कालव्याला मोठ्या प्रमाणात लागलेले गळतीचे ग्रहण काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता कालवाफुटीचे धोके समोर येऊ लागले आहेत. या धोकादायक कालव्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.


अर्ध्या-अर्ध्या किलोमीटरवर बोगदे

आंबेगाव तालुक्यात दुर्गम भागातील गाव व वाड्यावस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली आहे. पाळीव जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला असताना एकीकडे तालुक्याच्या पूर्व भागात कालव्यांना पाणी सोडल्यावर मात्र दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
डिंभे धरणातून आवर्तन
सुरू झाल्यावर कालव्यांची
गळती ही नित्याची बाब
झाली आहे. या कालव्याला अर्ध्या-अर्ध्या किलोमीटरवर बोगदे पडले असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. डिंभे धरणाच्या दोन्ही कालव्यांना लागलेले पाणीगळतीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.


चासकमानच्या डाव्या कालव्याचे आवर्तन बंद

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांनंतर गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले. चासकमान धरणामध्ये सध्या ४८.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
चासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन ५ डिसेंबर रोजी सोडण्यात आले होते. परंतु, रब्बी हंगामाच्या सोडण्यात आलेल्या आवर्तनाच्या पाण्याला शेतकºयांची मागणी नसल्यामुळे तब्बल ३१ दिवसांनंतर म्हणजेच ६ जानेवारी रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात आले होते. त्यानंतर लगेच १४ दिवसांनी खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार २० जानेवारी रोजी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते.
सोडण्यात आलेल्या दुसºया आवर्तनाचा शेतकरी बांधवांनी पुरेपूर फायदा घेतल्याने कांदा, बटाटा, गहू, ज्वारी, मका, हरभरा, मेथी, कोथिंबीर, फ्लावर, कोबीसह तरकारी पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. तर, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये खोदून तयार केलेली शेत तळी भरलेली असल्याने पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. तर, सोडण्यात आलेले आवर्तन ठरलेल्या तारखेनुसार बंद करण्यात आल्यामुळे शेतकरीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्याने पाण्याची नासाडी होत आहे. शेतकºयांच्या शेतजमिनीमध्ये सतत पाणी साचून शेतजमिनी मोठ्या प्रमाणात नापीक झाल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रशासनाला गळती रोखण्यासंदर्भात विचारले असता प्रशासन राज्य शासनाकडे बोट दाखवत आहे.
धरणापासून ते कमान, चास, आखरवाडी, बहिरवाडी, भांबुरवाडी, तिन्हेवाडी दरम्यान आदी भागात पाणीगळतीचे प्रमाण सर्वाधिक पाहावयास मिळत आहे.गळतीमुळे कालव्यातून ३० ते ४० टक्के पाणी वाया जात असते.त्यामुळे शेवट पर्यंत पाणी पोहोचतच नाही. यामुळे खेड तालुक्याच्या बॅकवॉटरवर असणाºया गावांना आणि शिरूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असणाºयांना शेतीचे क्षेत्र वाचविण्यापासून वंचित राहावे लागत असते.
 


Web Title: Dangerous canals!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.