डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:51 PM2018-02-26T17:51:48+5:302018-02-26T17:51:48+5:30

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या. डी. एस. कुलकर्णी यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर गुन्हे शाखेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

D. S. Kulkarni's six luxury cars seized; crime branch action in Pune | डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Next

पुणे- आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. डी. एस. कुलकर्णी यांना शुक्रवारी पुन्हा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या गाड्यांची किंमत सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपये आहे.
डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीत अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्याच रात्री त्यांना पोलीस कोठडीत त्रास झाल्याने रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालानंतर न्यायालयाने शुक्रवारी डीएसके दाम्पत्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस कोठडीत असताना त्यांना विचारलेल्या माहितीवरून त्यांच्याकडील आलिशान गाड्या या लॉ कॉलेज रोडवरील एका ठिकाणी ठेवल्या असल्याचे समजले. त्यानंतर सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या ६ गाड्या ताब्यात घेतल्या. त्यात अडीच कोटी रुपयांच्या २ बीएम डब्ल्यू, १ कोटी ७५ लाख रुपयांची पोर्शे, ७५ लाख रुपयांच्या दोन टोयाटो कॅमे आणि ३३ लाख रुपयांची एम व्ही़ अगस्ता या दुचाकीचा समावेश आहे.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी सांगितले की, डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीच्या साधारण ३५ गाड्या असल्याची माहिती मिळाली आहे. या ६ आलिशान गाड्यांव्यतिरिक्त आणखी एक आॅडीही असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तिचाही शोध सुरू आहे़. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आलिशान गाड्यांवर कोणतेही कर्ज नसल्याचे समजते़ हा तपास खूप किचकट आणि आर्थिक बाबींचा असल्याने त्यासंबंधीची कागदपत्रे मिळविणे व त्यांचा अर्थ समजावून घेऊन त्यानुसार चौकशी करण्याचे काम हे वेळखाऊ आहे. डी. एस. कुलकर्णी यांना अटक होऊपर्यंत सुमारे ४ हजार २०० जणांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात आता वाढ होऊन त्यांचा आकडा आता ५ हजारांहून अधिक झाला आहे.
डी़, एस. कुलकर्णी हे पोलिसांना आता तपासात सहकार्य करीत असले तरी ठेवीदारांना नेमका पैसा कोठे वापरला याची माहिती अजूनही ते देत नसल्याचे सांगण्यात येते. हा तपास खूप मोठा असल्याने पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेला जादा मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे हे तपास करीत आहेत.

Web Title: D. S. Kulkarni's six luxury cars seized; crime branch action in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.