संस्थाचालकाच्या पत्नीचा पेपर सोडविल्याप्रकरणी फौजदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 01:56 AM2018-10-30T01:56:09+5:302018-10-30T01:56:26+5:30

चौकशी समितीचा अहवाल स्वीकारला; झील संस्थेतील प्रकार

Court reserves the right to release his wife's papers | संस्थाचालकाच्या पत्नीचा पेपर सोडविल्याप्रकरणी फौजदारी

संस्थाचालकाच्या पत्नीचा पेपर सोडविल्याप्रकरणी फौजदारी

Next

पुणे : झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालकांच्या पत्नीचा पेपर त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सोडविल्याच्या प्रकरणामध्ये चौकशी समितीचा अहवाल सोमवारी विद्यापीठाला सादर करण्यात आला. परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे समितीच्या प्रथमदर्शनी निर्दशनास आले आहे. त्यानुसार संबंधितांवर विद्यापीठाकडून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयावर नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

झील एज्युकेशन सोसायटीच्या आभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेच्या संचालकांच्या पत्नीचे पेपर त्या महाविद्यालयात प्राध्यापकांनी सोडविल्याचा धक्कादायक प्रकार डिसेंबर २०१७ मध्ये घडला. याप्रकरणी पेपर सोडवून देणाऱ्या प्राध्यापकानेच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे जुलै २०१८मध्ये लेखी तक्रार केली होती. त्याचबरोबर त्या संस्थेतील माजी कर्मचारी योगेश ढगे यांनी या तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुलगुरूंनी एक समिती गठित केली. मात्र, ४ महिने उलटले तरी या समितीकडून जबाब नोंदविण्यापलीकडे काहीच कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. अखेर या दिरंगाईविरोधात ढगे यांनी विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर चार दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. त्यानंतर अखेर समितीची कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल परीक्षा मंडळाकडे सादर करण्यात आला. परीक्षा मंडळाने हा अहवाल स्वीकारला असून त्यामध्ये परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

या प्रकरणी समितीकडून चौकशी पूर्ण करून आठ दिवसांत कार्यवाही करू, असे आश्वासन प्रशासनाकडून त्यांना सातत्याने देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कारवाई करण्यास विलंब होत असल्याने योगेश ढगे यांनी उपोषण सुरू केले होते. जाणीवपूर्वक ही चौकशी रखडवली जात असल्याने उपोषण करीत असल्याचे ढगे यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुणाची समिती नेमण्यात आली आहे, याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. मात्र, समितीमधील दोन सदस्यांनी राजीनामा दिल्याने चौकशी रखडल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले होते. यामुळे आणखीनच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अखेर चौकशी समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला असून कारवाई सुरू झाली आहे.

संस्थाचालकांना इशारा
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांमध्ये परीक्षेच्या काळात अनेक गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. झीलच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकरण पुराव्यानिशी समोर आल्याने व तक्रारदारांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने याप्रकरणी कारवाई होऊ शकली आहे. ही कारवाई परीक्षेत गैरप्रकार करणाºया इतर महाविद्यालयांच्या संस्थाचालकांसाठी विद्यापीठाने दिलेला इशारा मानला जात आहे.

नेमकी कुणावर होणार कारवाई ?
झील एज्युकेशन सोसायटीच्या आभियांत्रिकी महाविद्यालयात संचालकाच्या पत्नीचा पेपर प्राध्यापकाने सोडविल्याचा गैरप्रकार घडल्याचे समितीच्या प्रथमदर्शनी निर्दशनास आले आहे. मात्र, या प्रकरणात कुणा-कुणावर कारवाई होणार, हे विद्यापीठाने अद्याप उघड केलेले नाही. फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती जाहीर करू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात घडलेला हा अत्यंत मोठा गैरप्रकार असल्याने याकडील कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Court reserves the right to release his wife's papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.