गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 09:30 PM2018-12-19T21:30:42+5:302018-12-19T21:32:08+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वधारले आहेत.

In comparison to last year, sesamum production declined by 60 percent | गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले

गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वधारले आहेत. तसेच यंदा राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी झाल्यास तिळाच्या दरामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा ‘तीळा’वरच संक्रात आली असल्याची भावन व्यापा-यांनी व्यक्त केली. 
 
    देशात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत प्रामुख्याने तिळाचे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत तिळाची गरज साडेचार लाख मेट्रिक टन इतकी आहे. गेल्या वर्षी देशात तिळाचे उत्पादन ४ लाख ५० हजार मेट्रिक टन इतके होते. यंदा सुमारे १ लाख ७७ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले असून मे २०१९ मध्ये बाजारात येणारे उन्हाळी तिळाचे उत्पादन साधारण ७० हजार मेट्रिक टन इतके राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन घटल्याने कच्च्या तिळाच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तिळाचे भाव किलोस १०० ते ११० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती मार्केटयार्डातील तिळाचे व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.

    जगात सुदान, युगांडा, इथोपिया, टांझानिया, नायझेरिया आदी आप्रिष्ठकन देशासह भारत, चीन, पाकिस्तान कोरिया आदी देशांत तिळाचे उत्पादन घेतले जाते. २०१७-१८ मध्ये जगभरात तिळाचे उत्पादन २१ लाख मेट्रिक टन इतके झाले होते. २०१८-१९ मध्ये त्यात वाढ होऊन २४ लाख ७७ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतात तीळ उत्पादनात झालेली घट समोर आल्यानंतर बाजारात तिळाचे किलोचे दर १७० ते १७५ रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, जगभरातील तीळ उत्पादन वाढीची आकडेवारी जाहीर होताच तिळाच्या दरात घट होऊन ते १४० ते १५० रुपयांवर आले. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत कच्च्या तिळाच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, स्वच्छ तिळाचे दर किलोस १६५ ते १७० पर्यंत आहेत. तिळाचा पुरवठा कमी-जास्त झाला, तरी दरात ५ ते १० रुपयांनी वाढ होईल, असेही पटेल यांनी सांगितले.

    याबाबत अजित बोरा म्हणाले, परदेशातून भारतात तिळाची आयात केली जाते. आयात तिळावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यंदा देशांतर्गत तिळाचे उत्पादन घटले आहे. उन्हाळी तिळाच्या उत्पादनाची परिस्थिती मे महिन्यात समोर येणार असली, तरी दुष्काळामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध तीळ उत्पादनावरच आपली गरज भागवावी लागणार आहे. मात्र, तिळाचे दर वाढल्यास तिळाला मागणी घटून खपावर परिणाम सुरू झाला आहे.

Web Title: In comparison to last year, sesamum production declined by 60 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.