आगामी निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही : मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:49 PM2019-03-14T12:49:52+5:302019-03-14T13:02:10+5:30

उमेदवाराचे नाव पक्षाच्या केंद्रीय समितीकडून निश्चित होत असते. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी त्याचे काम पक्ष संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांने करायला हवे...

In the up coming elections, the party will not tolerate internal discrimination: the implied warning of the Chief Minister | आगामी निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही : मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा 

आगामी निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही : मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा 

Next
ठळक मुद्देशहराध्यक्षांची मुंबईत बैठक पुणे लोकसभा मतदारसंघाची त्यांनी आवर्जून दखल घेत संघटनात्मक कामाचा आढावाआचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतही सुचनाकसलीही अडचण असली तर पक्षातील वरिष्ठांबरोबर संपर्क साधावा

पुणे: उमेदवार कोणीही असूद्या, पक्ष ठरवेल त्याप्रमाणे प्रचाराचे काम करावेच लागेल, कोणी गटबाजी करत असेल तर त्याची गय करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राज्यातील शहराध्यक्षांना बजावले. भाजपा लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघातील सर्व शहराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक घेतली. पुणे लोकसभा मतदारसंघाची त्यांनी आवर्जून दखल घेत संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.
युतीमध्ये भाजपा राज्यात २५ जागा लढवत आहे. त्या सर्व लोकसभा मतदारसंघातील शहराध्यक्ष, कोषाध्यक्ष यांना रविवारी मुंबईत बोलावून घेण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: या सर्वांची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उमेदवाराचे नाव पक्षाच्या केंद्रीय समितीकडून निश्चित होत असते. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी त्याचे काम पक्ष संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांने करायला हवे. गटबाजी, त्यांनी मला कधी विचारले नाही, आमच्या नेत्याला पद दिले नाही असल्या तक्रारी कोणी करत असेल तर त्याला तत्काळ समज देण्यात यावी. तरीही ऐकत नसेल तर कारवाई करावी. कोणीही असला तरी गय करू नये असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी बजावले.
त्याचबरोबर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतही सुचना करण्यात आली. कसलीही अडचण असली तर पक्षातील वरिष्ठांबरोबर संपर्क साधावा, सभा, बॅनेर, झेंडे, फ्लेक्स याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये. परवानगी असल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये. उमेदवाराच्या निवडणूक खचार्बाबत स्वतंत्र व्यक्तीची, त्याला सहायक म्हणून आणखी एका व्यक्तीची नियुक्ती करावी. त्यांच्याकडून हिशेब सादर होतात किंवा नाही याची माहिती घ्यावी असे सांगण्यात आले. आचारसंहितेतील नियमांची माहिती देण्यासाठी या बैठकीत काही निवृत्त अधिकाऱ्यांना खास उपस्थित ठेवण्यात आले होते. 
पुणे शहर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. विद्ममान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. मागील वेळीही बापट यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. ती न मिळाल्याने त्यांनी काही दिवस जाहीर प्रचारापासून स्वत:ला बाजूला ठेवले होते. त्यांचे समर्थकही त्यामुळे प्रचारात सहभागी झाले नव्हते. यावेळी तसे होणार नाही याची काळजी घ्यावी असे बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना शहराध्यक्ष गोगावले यांना सांगितले असल्याचे समजते. 
त्याचबरोबर भाजपाचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे यांनी पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती, ती न मिळाल्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांना मानणारे काही नगरसेवक पालिकेत आहेत. त्यांच्याकडे खास लक्ष द्यावे व त्यांना उमेदवार कोणीही असला तरी त्याच्या प्रचारात सहभागी करून घेण्यात यावे, जाहीर प्रचारातून त्यांच्यापैकी कोणी बाजूला रहात असेल तर त्याला समज देण्यात यावी असेही गोगावले यांना सांगण्यात आले. 
...................
मुंबईतील बैठक आचारसंहितेचे नियम तसेच पक्ष संघटनेचे लोकसभा मतदारसंघातील काम याची माहिती घेण्यासाठी बोलावली होती. स्वत: मुख्यमंत्र्यांनी सर्व आढावा घेतला. गटबाजीबाबत ते बोलले. पुण्यात कसलीही गटबाजी नाही. पुणे लोकसभा मतदारसंघातील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आचारसंहितेमुळे आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व राजकीय गोष्टी काळजीपूर्वक हाताळण्याच्या सुचना त्यांनी शहराध्यक्षांना दिल्या.
योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजपा, पुणे

Web Title: In the up coming elections, the party will not tolerate internal discrimination: the implied warning of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.