Cheating with the premezzle of Stamsell's preserve, 65 thousand boils from the woman | स्टेमसेल्स प्रिझर्वच्या बहाण्याने फसवणूक, महिलेकडून ६५ हजार उकळले  

पुणे : डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणाºया आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून ६५ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलिसांंकडे फिर्याद दिली आहे़ डॉ. चैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे ते २ जून २००८ या कालावधीत स्मिता तिजुरी यांची मुलगी डिलिव्हरीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथे दाखल झाली होती. पौड रस्त्यावरील शिलाविहार कॉलनी येथे सुदर्शन अपार्टमेंटमध्ये डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक कार्यालय होते. त्या वेळी त्यांचा विश्वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार महिलांनी ‘स्टेमसेल्स’बद्दल महिलेला माहिती दिली. तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह केल्यास भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले तर त्यावर औषध शोधता येऊ शकते. त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल, असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून स्टेमसेल्स प्रिजर्व करण्याच्या बहाण्याने ६५ हजार रुपये घेण्यात आले.
त्यानंतर तिजुरी यांनी ‘स्टेमसेल्स’बद्दल चौकशी केली नाही. दरम्यानच्या काळात डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेकचे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र याबाबत तिजुरी यांना कळविण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना डॉ. चैतन्य पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शंकर खटके अधिक तपास करत आहेत.