घरफोडी करणारी टोळी गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 09:46 PM2018-03-30T21:46:56+5:302018-03-30T21:46:56+5:30

पुणे व अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांत ६० ते ७० ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

burglary gang arrested | घरफोडी करणारी टोळी गजाआड 

घरफोडी करणारी टोळी गजाआड 

Next
ठळक मुद्देमार्च महिन्यात सलग तीन वेळा फ्लॅट फोडून चोऱ्या झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले

नारायणगाव :  पुणे व अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांत ६० ते ७० ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या चोरट्याने नारायणगाव व परिसरात बंद फ्लॅट फोडून घरफोडी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे. दरम्यान, या चोरट्यांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अंकुश लक्ष्मण लष्करे (वय २९, सध्या रा. निगडी, मूळ रा. केडगाव, अहमदनगर), विशाल फुलचंद पवार (वय २८, रा. निगडी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार : नारायणगाव येथील बांधकाम व्यावसायिक अशोक डुंबरे यांचा वाजगे आळीजवळील फ्लॅट फोडून २० हजारांची रोख रक्कम व काही सोन्याचे दागिने १ मार्च २०१८ रोजी नेले होते. ८ मार्चला दुपारी १२ च्या सुमारास ओंकार सोसायटीतील रुपेश गायकवाड यांच्या मालकीची ए विंग फ्लॅट क्र. ८ मधील फ्लॅट फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. दि. १६ मार्चला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सचिन नरेंद्र कोºहाळे (रा. सुदर्शन सोसायटी अ विंग फ्लॅट क्र. ७ नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट तोडले होते. या ठिकाणी चोरट्यांनी कपाटातील सर्व कपडे, इतर वस्तू अस्ताव्यस्त करून २ तोळे चांदी, टायमेक्स कंपनीची ४ हजार रुपये किमतीची दोन घड्याळे चोरून नेली होती. मार्च महिन्यात सलग तीन वेळा फ्लॅट फोडून चोऱ्या झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले होते.  
 गोरड यांनी घरफोडी झालेल्या सर्व ठिकाणची व परिसराची पाहणी करून चोरट्यांनी कशा पद्धतीने चोºया केल्या आहेत, परिसरातील व सोसायटीला सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पोलीस नाईक दीपक साबळे, रामचंद्र शिंदे, भीमा लोंढे, धनंजय पालवे, दिनेश साबळे, सचिन कोंबल, संदीप आबा चांदगुडे, प्रकाश जढर, नवीन अरगडे यांची दोन पथके तयार केली.ऱ्या
  नारायणगावात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून शोधमोहीम सुरू केली असता पथकाला दोन संशयितांची छायाचित्रे व एक दुचाकी आढळून आली. या माहितीच्या आधारे पथकाने वेषांतर करून जुन्नर तालुक्यात विविध परिसरात शोधमोहीम सुरू केली.  सोमवारी, २६ मार्चला दुपारी १२ वा. गस्त घालत असताना नारायणगाव ओझर रस्त्यावर लाल रंगाची हंक (एमएच १६ एएच १४५३) दुचाकी दिसून आली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकी असल्याचे पोलिसांना आढळून आले. पथकाने परिसरातील इतर पोलिसांना माहिती देऊन नाकाबंदी केली. पोलीस कर्मचारी रामचंद्र शिंदे, भीमा लोंढे यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तो पूनम हॉटेल शेजारील जुन्नर ओझर रस्त्याने जात असताना पोलीस नाईक दीपक साबळे व धनंजय पालवे यांनी समोरून येऊन त्याला दुचाकी आडवी लावून अडथळा निर्माण करून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन चौकशीत त्याने नाव अंकुश लक्ष्मण लष्करे सांगितले. 
 सखोल चौकशीमध्ये त्याने त्याचा साथीदार विशाल फुलचंद पवार याच्या मदतीने जिल्ह्यातील नारायणगाव, मंचर, खेड, जुन्नर, पिंपरी, सांगवी, देहूरोड, निगडी, चतु:शृंगी व अहमदनगर जिल्ह्यात ६० ते ७० ठिकाणी घरफोडी केली असल्याची कबुली दिली.  

Web Title: burglary gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.