धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’; वसतिगृहातील मुलींचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:15 PM2024-03-27T12:15:53+5:302024-03-27T12:16:08+5:30

पीडित मुलीवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत....

'Brain stroke' to disabled girl due to ragging in Lonavala; Pride of hostel girls | धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’; वसतिगृहातील मुलींचा प्रताप

धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’; वसतिगृहातील मुलींचा प्रताप

लोणावळा (पुणे) : लोणावळ्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अपंग मुलीला वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मुलींनी केलेल्या रॅगिंगमुळे ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पीडित मुलीवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पीडित मुलगी १९ वर्षांची असून, लोणावळ्यातील वसतिगृहात इतर तीन मुलींसोबत राहत होती. तिच्या अपंगत्वामुळे तिन्ही मुली तिची छेड काढत असत. दोन-तीन महिने हा प्रकार सुरू होता, असे समजते. याबाबत पीडितेने वडिलांना सर्व माहिती दिली. यातील एका मुलीच्या पालकांना पीडितेच्या वडिलांनी बोलावले होते. तुमची मुलगी माझ्या मुलीवर रॅगिंग करते, असे सांगितल्यावर त्यांनी मुलीला समजाविण्याऐवजी पीडितेच्या वडिलांना धमकावले होते. पीडितेने तीन मुलींबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. मात्र, दखल घेतली न गेल्याने मानसिक तणावात जाऊन तिला ब्रेन स्ट्रोक आला असल्याचे तिच्या वडिलांचे सांगणे आहे.

रॅगिंगच्या आरोपावरून संबंधित तीन मुलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. तक्रार नोंदवूनही ग्रामीण पोलिस न्याय देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पीडित मुलीचा जबाब महत्त्वाचा

याविषयी लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले, संबंधित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महाविद्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती मागविण्यात आली आहे. पीडित मुलीचा जबाब महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या ती बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने मंगळवारी जबाब नोंदविण्यात आला नाही. बुधवारी पुन्हा एकदा भेट घेत जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानुसार, पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: 'Brain stroke' to disabled girl due to ragging in Lonavala; Pride of hostel girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.