कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 12:23 PM2018-01-05T12:23:28+5:302018-01-05T14:28:27+5:30

समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhima Koregaan incident: Action should be taken against those who create turbulence in society - Udayan Raje Bhosale | कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर

कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर

Next

नवी दिल्ली - कोरेगाव भीमा घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घरचा अहेर दिला आहे. जातीच्या आधारावर देशाचे तुकडे होण्याआधी माझे डोळे मिटलेले बरे. देशाचे तुकडे झालेले मला सहन होणार नाही, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना घरचा अहेर दिला आहे. शिवाय समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. हिंसाचारामुळे दोन हजार कोटींचं नुकसान, उद्रेक करणारी वक्तव्यं करु नयेत, असं आवाहनदेखील यावेळी उदयनराजेंनी केले.  

संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले
संभाजी भिडे यांच्याबाबत मनात आदर आहे, ते मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रॉफेसर होते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर माझे गुरुजींसोबत बोलणे झाले, त्यावेळी बोलताना गुरुजी रडले, असे उदयनराजे यांनी सांगितले. तसंच संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही, असेदेखील उदयनराजेंनी ठणकावून सांगितले आहे.  

आरोप निराधार - संभाजी भिडे

कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमा दंगलीत मी उपस्थित होतो व कारणीभूत आहे, असं विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांचे आरोप निराधार असून शासनाने या घटनेची म्हणजेच बनावाची पाळेमुळे शोधून चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गुरुवारी (4 जानेवारी) पत्रकाद्वारे केली आहे. 

संभाजी भिडे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्राच्या आधारावर राष्ट्रजागृती करण्याचे काम आम्ही करतो. "कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत मी होतो व मी कारणीभूत आहे', असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेप्रमाणे गावोगावी त्यांच्या अनुयायांनी तोडफोड करून वाहने, घरे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस केला आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींमध्ये माझे नाव कारणीभूत असल्याचे आंबेडकर बोलले आहेत. त्यांनी निराधार आरोप करून माझ्यावर अटकेची कारवाई करून गुन्हा नोंद करून, मला याकूब मेमनची वाट दाखवावी, अशी मागणी केली आहे. 

माझी शासनाला विनंती आहे की, या घटनेची म्हणजेच बनावाची खोलात जाऊन पाळेमुळे शोधून चौकशी करावी. जे अपराधी असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. 


 

भीमा-कोरेगाव घटनेला कोणताच रंग देऊ नये, प्रकरण वाढवू नये- शरद पवार 
भीमा-कोरेगाव इथे गेल्या 200 वर्षापासून लोक येतात. पण आजपर्यंत तिथे कधी संघर्ष झाला नाही. 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहजिकच तिथे उपस्थिती जास्त असेल याची प्रशासनालाही कल्पना होती. अशावेळी तिथे योग्य ती काळजी घेण्याची गरज होती. आता या घटनेला कोणताच रंग देऊ नये. प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केलं आहे. 

जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

या घटनेविषयी मी वढू गावातील लोकांशी संवाद साधला. पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी येथे येऊन चिथावणी दिल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. बाहेरून आलेले लोक गोंधळ करून गेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांचा या घटनेशी काहीएक संबंध नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणं असल्याचे त्यांनी सांगितलं.

Web Title: Bhima Koregaan incident: Action should be taken against those who create turbulence in society - Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.