bhim devotees gather at ambedkar statue near pune station | महामानवाला अभिवादन ; पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी
महामानवाला अभिवादन ; पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांच्या उत्कर्षाकरिता आयुष्य पणाला लावून त्यांना प्रकाशाची वाट दाखविणारे आणि समता, न्याय व बंधुता या मुल्यांची आपल्या विचारातून शिकवण देणा-या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनमाणसांचे सामाजिक, वैचारिक प्रबोधन, संविधानविषयक जनजागृती आदी कार्यक्रमांवर मुख्य भर देण्यात आल्याचे यावेळी पाहवयास मिळाले. 


   पुणे स्टेशन व कॅम्प परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण केला. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता लहान मुले, महिला यांच्याबरोबरच ज्येष्ठांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकवटले होते. गुरुवारी पहाटेपासूनच हजारो भीमसैनिक जिल्हयाच्या वेगवेगळ्या भागातून येत होते. याप्रसंगी राजकीय पक्षांबरोबर अनेक  सामाजिक संस्थांनी देखील बाबासाहेबांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केले. पुणे स्टेशनच्या परिसरात बाबासाहेबांच्या पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच भारतीय संविधानाची प्रतीचे वाटप काही संस्थांकडून करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
     महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधुन शहरातील वेगवेगळ्या भागांतील गरीब निराधार महिलांंना साडी वाटप, नेत्रचिकित्सा शिबीर, रक्तगट व मधुमेह तपासणी शिबीर, अंधवृध्दांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. यात राजकीय पक्षांसह इतर सामाजिक संस्थांचा सहभाग होता. स्टेशन परिसरात डॉ.बाबासाहेबांच्या कार्यात्मक आठवणींचे स्मरण करुन देणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे रेल्वेस्थानक परिसरातील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  


Web Title: bhim devotees gather at ambedkar statue near pune station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.