Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:00 PM2024-03-29T13:00:29+5:302024-03-29T13:01:19+5:30

इमारतीसमोरील म्यूरल, भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था, परिसर आदी सर्व गोष्टी बदलण्यात आल्या

Balgandharva got a new look Rangmandir started in a new light | Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू

Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू

पुणे : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद असलेले बालगंधर्व रंगमंदिर आता नव्या रूपात, नव्या साजात पुणेकर रसिकांसमोर येत आहे. इमारतीसमोरील म्यूरल, भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था, परिसर आदी सर्व गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराला नवी झळाळी मिळाल्याचे दिसून येत आहे. बालगंधर्व रंगमंदिर गुरुवारी (दि.२८) दिमाखात पुन्हा सुरू झाले आहे.

अनेक वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिराची दुरवस्था झाली होती. त्याविषयी सर्वजण ओरडत होते. मेकअप रूम, रंगमंदिरात डासांचा त्रास आदी कारणांमुळे सातत्याने दुरवस्थेचे ‘नाट्य’ अनुभवायला येत होते. याविषयी ‘लोकमत’ने देखील नाट्यगृहांची दुरवस्था यावर वृत्तमालिका करून प्रकाश टाकला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन त्वरीत दुरूस्तीचे आदेश दिले होते. अखेर आता बालगंधर्व रंगमंदिराची पूर्ण दुरूस्ती झाली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपासून ते सुरू झाले. रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते तसेच बालगंधर्व रंगमंदिराचे नवे रूप सर्वांना भावते आहे.
रंगमंदिराच्या समोर मोकळ्या जागेत हिरवाईचा शालू पांघरण्यात येणार आहे तसेच आजूबाजूला रोपांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. झाडांच्या आजूबाजूलाही सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे रसिकांना आता नव्या रूपातील रंगमंदिर पाहायला मिळत आहे.

बालगंधर्व रंगमंदिराची दुरूस्ती करण्यासाठी पालिकेचे सल्लागार, ज्येष्ठ कलावंत यांच्या बैठका घेऊन चर्चा करायचो. त्यानुसार आम्ही बालगंधर्व रंगमंदिराचे सुशोभीकरण कसे करता येईल, यावर बोलायचो. व्हीआयपी रूममध्ये ज्येष्ठ कलावंत बसतात. त्यांच्यासाठी खास रूम असावी म्हणून तिथे विशेष बैठक व्यवस्था केली. पडदे बदलले. - विकास ढाकणे, माजी अतिरिक्त आयुक्त, महापालिका

कलाकृतीही साकारणार

बालगंधर्व रंगमंदिराच्या समोरील परिसरात देखील विविध कलाकृती उभारण्यात येणार आहेत. सध्या काही ठिकाणी छोट्या कुंड्यांमध्ये रोप लावलेली आहेत. तर अजून बरेच काम पूर्ण व्हायचे आहे. आतील रंगमंदिराचे काम मात्र पूर्ण झालेले आहे. 

Web Title: Balgandharva got a new look Rangmandir started in a new light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.