बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला ठोकला रामराम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:53 PM2018-05-08T18:53:05+5:302018-05-08T18:53:05+5:30

देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Balasaheb Ovhal out of BJP | बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला ठोकला रामराम 

बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला ठोकला रामराम 

Next
ठळक मुद्देबहुजनांनी निवडून दिलेले असल्याने पाच वर्षे त्यांची सेवा करणारविधानसभा लढविण्यास मी सज्ज 

रावेत : भाजपच्या चिन्हावर प्रथमच प्रभाग१६ मधून निवडून आलेले नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. भाजपमध्ये अस्वस्थ व असुरक्षित वाटत असल्याने पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा राजीनामा देणार असलो तरी नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जर वेळ आली तर तोही देऊ असेही ते म्हणाले. राजकीय वाटचालीत सत्ताधारी भाजपपासून अलिप्त राहण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात दलितांवरील अन्यायाच्या घटना वाढल्या आहेत. देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारण व धोरणामुळे अस्वस्थ असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविताना म्हणाले,मोठ्या विश्वासाने भाजपमध्ये आलो होतो पण विश्वासघात झाला.पक्ष सोडण्यामागील भूमिका स्पष्ट करताना ओव्हाळ म्हणाले, अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा काही अंशी गैरवापर होत आहे, हे मान्य आहे. पण त्याचा अर्थ त्यात बदलच करणे उचित नाही. ते त्यावरचे औषध नाही. त्यासाठी दुसरा कायदा हवा तर आणावा. बहुजनांनी निवडून दिलेले असल्याने पाच वर्षे त्यांची सेवा करणार आहे. मात्र पक्षातून बाहेर पडल्यानंतर ही सेवा करताना अडचण आली, नगरसेवकपदाचाही त्याग करू असे ते म्हणाले. काही मंडळी दलित कार्डाचा वापर करून एकसंघ होण्यामध्ये अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगत आठवलेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. भीमा-कोरेगाव दंगलीच्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील दलित समाजाच्या लोकांच्या पदोन्नत्या शासनामध्ये रखडल्या आहेत. भाजपची विचारसरणी व धोरणाच्या आपण विरोधात आहोत. पक्षातील कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याच्या विरोधात नाही. माझ्या निर्णयावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी. यावेळी आरपीआय चे शहराध्यक्ष सुधाकर बारभुवन,सरचिटणीस बाबा सरोदे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकते, कोषाध्यक्ष गौतम गायकवाड,सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते.

विधानसभा लढविण्यास मी सज्ज 
२०१९ मध्ये येऊ घातलेली विधानसभा निवडणूक पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत. त्याची पूर्णपणे माझी तयारी झाली असून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपकडून लढणार नाही.तर ती भाजपच्या विरोधात लढणार आहे. सर्वसमावेश विचारणीसरणीच्या राजकीय पक्षासोबत किंवा वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही बाळासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Balasaheb Ovhal out of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.