प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:53 PM2024-04-02T12:53:44+5:302024-04-02T12:54:08+5:30

घटनस्थळावरून जाणाऱ्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले

Attempt to attack young woman with a knife after breaking up a relationship A repeat of the incident in Sadashiv Petha was avoided | प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली

पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला झाल्याची पुनरावृत्ती सोमवारी (ता.१) पुन्हा एकदा घडली. ११ वीत शिकणाऱ्या मुलीवर एका तरुणाने प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून भररस्त्यात अडवत तिच्यावर कोयत्याने भरदुपारी हल्ला केला. येथून जाणाऱ्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले. पण, त्यांनी जाताना चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकावले तसेच अंदाधुंद कोयता फेकत गोंधळ घातला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पसार झालेल्या मुलांचा पोलिस शोध घेत आहेत. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

खडक पोलिसांकडून मात्र असा काही प्रकार घडला नसून, त्याच्याकडे कोयता तो रस्त्यावर पडला होता, असे सांगण्यात आले. कोयता बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. तो तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता. त्याने तरुणी बोलत नसल्याच्या रागातून हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. महेश सिद्धप्पा भंडारी (२२, रा. जनता वसाहत) असे कोयताधारी आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका जणाविरोधात रात्री उशिरापर्यंत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश जनता वसाहतीत वास्तव्यास आहे, तर कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी त्याच्या ओळखीची आहे. तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत दुपारी साडेबाराच्या सुमारास सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून निघाली होती. त्यावेळी महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. दोघे बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी महेशने तिच्यावर कोयता उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी एक महिला येथून जात असताना तिने हा प्रकार पहिला आणि ती जोरात ओरडली. महिला ओरडल्याने नागरिक जमा झाले. काही तरुण व व्यक्ती धावत येथे आले. पण, तरीही दोघे तरुण दुचाकी सुसाट पळवत हातात कोयता फिरवत नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळात मोठी गर्दी झाली. त्यावेळी तरुणाने हातातील कोयता फेकून मारला आणि पळ काढला, असे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी ही माहिती खडक पोलिसांना दिली. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत दोघे दुचाकीस्वार येथून पळून गेले होते. नागरिकांनी त्यांचे फोटो व दुचाकीचा फोटो पोलिसांना दिला.

माहिती घेतली असता हा तरुण जनता वसाहतीत राहत असल्याचे समजले. त्याने दुचाकी दुसऱ्या एका मित्राची आणली होती. सोमवारी रात्री महेशला पोलिसांनी पकडून आणले. दरम्यान, पोलिसांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी हल्ला झाला नाही, असे सांगितले.

तरुणी बोलत नसल्याच्या कारणातून प्रकार..

पेरूगेट चौकीजवळ कॉलेज तरुणीवर अशाच प्रकारे हल्ला झाला होता. प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून तिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. सुदैवाने ती तरुणी बचावली होती. भरदिवसा रस्त्यावर पेरूगेट पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला होता. मात्र, त्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. परंतु, आता पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती होताना टळली. सुदैवाने ही तरुणीदेखील हल्ल्यातून बचावली आहे. पण, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तिला मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Attempt to attack young woman with a knife after breaking up a relationship A repeat of the incident in Sadashiv Petha was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.