चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान

By नितीश गोवंडे | Published: May 30, 2023 04:53 PM2023-05-30T16:53:08+5:302023-05-30T16:54:15+5:30

शेजारील राष्ट्रांची भारताशेजारील बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज

Army is ready to protect India's territory even though it does not want a conflict with China - CDS Anil Chauhan | चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान

चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान

googlenewsNext

पुणे : जागतिक परिस्थिती सध्या बदलत आहे. देशाच्या उत्तर सीमेवर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच हिंद महासागरात त्यांचा वावर वाढलेला आहे. यासोबतच शेजारील राष्ट्रांची भारताशेजारील बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज आहे. चीनशी संघर्ष नको असला तरी देशाच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज आहे, असा विश्वास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केला. मंगळवारी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४ व्या तुकडीचे दीक्षांत संचालन मंगळवारी खेत्रपाल मैदानावर उत्साहात पार पडले. यावेळी या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सीडीएस अनिल चव्हाण बोलत होते.

या दीक्षांत सोहळ्यावेळी लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्ट. जन. अजयकुमार सिंग, एनडीए कमांडंट अजय कोचर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल संजीव डोगरा यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रपती सुवर्णपदक अफरीदी अफरोज, रौप्य पदक अंशु कुमार आणि ब्राँझ पदक प्रवीण सिंग यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

चौहान म्हणाले, देशाच्या उत्तर सीमेवर चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या आहेत. १९६२ पासून ते मागे गेलेले नाहीत. भारतीय सीमेवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये अशी आशा आहे. उत्तर सीमेवर चीन सोबत संघर्ष करण्याची मनीषा नाही. मात्र, असे असताना भारतीय भूभागाचे रक्षण ही आमची जबाबदारी असून ही जबाबदारी आम्ही चोख पणे पार पाडू. मंगळवारी एनडीए येथे पार पडलेल्या संचलन सोहळ्यात मी काही मुली पाहिल्या. त्यांना पाहून मनापासून आनंद झाला. मी या मुलींचे मनापासून अभिनंदन करतो की, आज त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्या उभ्या आहेत. इतिहासात झाशीच्या राणीने ब्रिटिशांशी लढा दिला. त्याच प्रमाणे तुम्ही सुद्धा प्रेरणा घेऊन देशासमोरील आव्हानांना तोंड देत देशाचे रक्षण कराल. जेव्हा स्वतःला विसरून तुम्ही देशाची सुरक्षा कराल तेव्हा तुम्ही खरे सैनिक म्हणून ओळखले जाल, असेही चौहान म्हणाले. भारतीय लष्कर नव्या तंत्रज्ञाचा स्वीकार करत आहे. नव्या तंत्रज्ञानाची उत्क्रांती लष्करात होत आहे. अशा परिस्थितीत मला विश्वास आहे की आगामी काळात तुम्ही एकत्र येऊन काम कराल, असे म्हणत चौहान यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मणिपूरमधील आव्हाने संपलेली नाहीत, थोडा वेळ लागेल 

मणिपूर येथे सध्या जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. मणीपुर येथे २०२० मध्ये लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात होते. त्यावेळी तेथील परिस्थिती नियंत्रणात होती. यामुळे कालांतराने येथील लष्कर कमी करण्यात आले. तेथील बंडखोरी नियंत्रणात आली आहे. दरम्यान, जे सध्या मणिपूर येथे सुरू आहे, त्याचा बंडखोरीशी काही संबंध नाही. मणिपूर येथे असलेल्या दोन जातीमधील हा संघर्ष आहे. यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराने त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आहे. अद्याप मणिपूर मधील आव्हाने संपलेली नाहीत. पण, येत्या काळात परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्या ठिकाणी सुरू असलेली परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकार योग्य पद्धतीने हाताळेल, अशा विश्वास देखील सीडीएस चौहान यांनी व्यक्त केला.

तिन्ही दलांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला वेग..

भारतीय लष्कर वेगाने बदल करत आहे. यातील महत्वाचा बदल म्हणजे तिन्ही दलांचे एकत्रीकरण करणे आहे. लष्कराच्या ‘थेटरायझेशन’ची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या अंतर्गत संयुक्तता आणि एकत्रीकरण हे दोन भाग असून या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात आमचं त्या दिशेने काम सुरू असल्याचे चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Army is ready to protect India's territory even though it does not want a conflict with China - CDS Anil Chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.