जातीवाद हेच आरएसएस-भाजपाचे मूळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:08 AM2018-01-01T05:08:11+5:302018-01-01T05:13:35+5:30

जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे.

 Apartheid is the root of the RSS-BJP | जातीवाद हेच आरएसएस-भाजपाचे मूळ  

जातीवाद हेच आरएसएस-भाजपाचे मूळ  

googlenewsNext

पुणे : जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे. ही नवी पेशवाई असून, त्याविरोधात सर्वांनी संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन एल्गार परिषदेत करण्यात आले.
भीमा कोरेगाव येथील क्रांतीला २०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा दिन अभियानांतर्गत रविवारी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते चातुर्वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना अब्दुल हमीद अजहरी, जेएनयूमधील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद, उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते विनय रतन सिंग, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता प्रशांत दोंथा, छत्तीसगढमधील आदिवासी नेत्या सोनी सोरी, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन आदी या वेळी उपस्थित होते. शेकडो संघटनांनी एकत्रित येत या परिषदेचे आयोजन केले होते. शनिवारवाड्याच्या प्रांगणात झालेल्या या परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला.
उमर खालीद म्हणाला, ‘‘पंतप्रधान रामंदिरावर चर्चा करतील. पण जय शहा यांच्या ‘टेम्पल’ या कंपनीवर बोलणार नाहीत. हिंदूराष्ट्र ही कल्पना लोकशाहीविरोधी आहे. तसे झाले तर ते देशासाठी दुर्दैवी असेल. जे वैचारिकदृष्ट्या कमजोर आहेत, त्यांच्याकडून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या जातात. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये २०० वर्षांपूर्वी पेशवाई संपली. पण आजही मनुवाद व जातीवाद जिवंत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनाही यांनी देशद्रोही ठरवले असते. जातीवाद ही आरएसएसची ताकद असून, त्याला संपविण्याची गरज आहे. ’’

संघ समाप्ती संमेलन घेऊ

येत्या १४ एप्रिल रोजी मी अहमदाबादमध्ये नसेल तर नागपूरमध्ये येऊन संघ समाप्ती संमेलन घेऊ. लोकशाही संपवून संविधान बदलण्याची त्यांची इच्छा असल्याचे हेगडे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्यांचा हा डाव आधीपासूनच आहे. हिंमत असेल तर संविधान बदलून दाखवाच, २०१९ मध्ये मोदींना घरी बसवून संविधान वाचवू, असेही जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले.
कुठेही जा...
नरेंद्र मोदी यांनी हिमालयात जावे, या जिग्नेश मेवाणी यांच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याचा पुनरुच्चार मेवाणी यांनी केला. ते म्हणाले, त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता वैतागली आहे. केवळ जुमलेबाजी असते. त्यामुळे त्यांनी आता हिमालयात, नैनिताल कुठेही जावे. जागा त्यांनी निवडावी. तसेच निवडणुकीत त्यांनी ‘राम’ विरुद्ध ‘हज’ असे चित्र रंगविले होते. मोदींच्या डोक्यातील ही घाण संपविण्यासाठी त्यांच्या डोक्यात स्वच्छता अभियान राबवायला हवे, अशी खोचक टीका मेवाणी यांनी केली.

राजकारण विसरून
एकत्र या
दलित समाजातील अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत. हे पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी एकत्रित येत लढा उभारण्याची गरज आहे. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामातून प्रेरणा घेऊन भाजपा आणि आरएसएस या नव्या पेशवाईविरोधात उभे राहायला हवे. स्मृती इराणीसह इतरांनी मिळून रोहितची हत्या केली. रोहितचे जे झाले ते इतर तरुणांबाबत घडू नये. यासाठी मी घराबाहेर पडून ही लढाई सुरू केली आहे. - राधिका वेमुला

‘आरएसएस’ला २०२२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या काळात ते सत्ता मिळवून संविधान बदलण्याचा प्रचार करत आहेत. तुम्ही सरकारच्या विरोधात बोलले की देशद्रोही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणे अवघड झाले आहे. भीतीचे आणि दडपशाहीचे जे वातावरण देशात निर्माण झाले आहे, त्याच्या विरोधात लढावे लागेल.
- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Web Title:  Apartheid is the root of the RSS-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.