शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:13 PM2024-03-27T18:13:44+5:302024-03-27T18:14:45+5:30

अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले असून त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट

ankur of acting was only in school plays FTII student in Bengal 1947 in lead role | शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

उमेश जाधव 

पुणे : सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर अभिनयाचं स्वप्न जगणाऱ्या अंकुर अरमाम यांच्यातील अभिनयाचा अंकुर शालेय जीवनातच बहरला. एफटीआयआयचा विद्यार्थी असलेला अंकुर ‘बंगाल १९४७ : ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी‘या आगामी हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं हे त्याचं पहिलं पाऊल ठरणार आहे.

लहान असताना शाळेत कृष्णाची भूमिका केली होती. पुढील दोन दिवस लोकांनी खूप कौतुक केलं. त्यानंतर अधिकाधिक चांगली भूमिका कशी करता येईल यासाठीच प्रयत्न केला, असे अंकुर म्हणाला. अंकुर हा मूळचा दिल्लीचा. गाझियाबादमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्याने अनेक नाटकांमध्ये काम करून वाहवा मिळवली. प्रख्यात अभिनेत्री शिल्पी मारवाह यांच्याकडून त्याने तीन वर्षे दिल्लीत अभिनयाचे धडे गिरवले.

अभिनयातील बारकावे शिकताना त्याने अनेक नाटकांमध्येही काम केलं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या अंकुरला अभिनयाचं वेड स्वस्थ बसू देईना. चित्रपट आणि अभिनय समजून घेण्यासाठी त्यानं पुणे शहर गाठलं. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) येथे त्यानं दोन वर्षे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. अभिनय करताना चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार, सूक्ष्म छटा, हजरजबाबीपणा, संवादफेक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर अंकुरने मेहनत घेतली. अभिनय क्षेत्राची ही सुरुवात असून भविष्यात वेगळी उंची गाठायची आहे त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी आहे, असे अरमाम सांगतो.

बंगाल १९४७ चित्रपटात कोणती भूमिका?

अंकुरने सर्वप्रथम सोनी लिव या बहुचर्चित वेबसिरीज ‘ए सिंपल मर्डर’मध्ये दिसला. या वेबसिरीजमध्ये त्याने अतिशय महत्त्वाची आणि दमदार भूमिका निभावली होती. अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले आहेत. त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट आहे. पुढील तीन दिवसांत रिलीज होणाऱ्या या चित्रपटाद्वारे बंगाल विभाजनाच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. १९४७ मध्ये फाळणी झाल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि एक सुंदर प्रेमकहाणी यावर आधारित हा चित्रपट आहे. अंकुरवर मोहन हे पात्र साकारण्याची जबाबदारी होती आणि ती अतिशय सहजतेने पार पाडली आहे. मोहन हा एक सुशिक्षित तरुण आहे ज्याला आपली मते आणि भावना स्पष्टपणे कशा मांडायच्या हे माहीत आहे. तो प्रामाणिक आहे आणि त्याच्याकडे प्रगतिशील मन आहे. मोहन जगाचे कायदे आणि परंपरा आणि प्रस्थापित निकषांचे प्रश्न सखोलपणे समजून घेण्यावर विश्वास ठेवतो. तो जात, रंग, वंश किंवा सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणाचाही न्याय करत नाही. चित्रपटात देवोलिना भट्टाचार्जी, सोहेला कपूर, ओंकार दास माणिकपुरी, आदित्य लखिया, अनिल रस्तोगी, प्रमोद पवार, सुरभी श्रीवास्तव, फलक राही, विक्रम टीडीआर आणि अतुल गंगवार यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

लहान असताना नाटकांमध्ये सर्वोत्तम काम करण्यावर भर असायचा; पण करताना अभिनय कधी आणि कसा आवडू लागला हे कळलंच नाही. दिल्लीत सुरुवात केली आणि पुण्यात अभिनयाचे अनेक पैलू उलगडण्यास मदत झाली. त्यामुळेच ‘बंगाल १९४७“ या चित्रपटात मुख्य भूमिका करू शकलो. भविष्यात अनेक भूमिका गाजवण्यासाठी सज्ज आहे. - अंकुर अरमाम, अभिनेता.

Web Title: ankur of acting was only in school plays FTII student in Bengal 1947 in lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.