भाजपाच्या पन्नाप्रमुखांना अमित शाह देणार विजयाचा ‘कानमंत्र’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:52 PM2019-02-07T14:52:07+5:302019-02-07T15:02:02+5:30

पन्नाप्रमुख ही भाजपाची संघटना पातळीवरील खास गोष्ट आहे.

Amit Shah's 'Kanamantra' of victory for BJP's pannapramukh | भाजपाच्या पन्नाप्रमुखांना अमित शाह देणार विजयाचा ‘कानमंत्र’ 

भाजपाच्या पन्नाप्रमुखांना अमित शाह देणार विजयाचा ‘कानमंत्र’ 

Next
ठळक मुद्देयुक्तीच्या चार गोष्टी : पुणे, बारामतीसह शिरूरलाही निमंत्रण मतदार यादीतील १ हजार मतदार या अर्थाने  हजारीपन्ना प्रमुख अशी ही संकल्पना

- राजू इनामदार-  
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक पातळीवर भारतीय जनता पाटीर्ने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडे असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासह पुणे व बारामती मधील पन्नाप्रमुखांबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ९ फेब्रुवारीला स्वत: संवाद साधून विजयचा कानमंत्र देणार आहेत. 
पन्नाप्रमुख ही भाजपाची संघटना पातळीवरील खास गोष्ट आहे. त्याचा संदर्भ थेट मतदारयादीशी आहे. ही रचनाही शहा यांनी पुर्वीच्या रचनेत काही बदल करून स्वत: केली आहे. मतदार यादीतील १ हजार मतदार या अर्थाने  हजारीपन्ना प्रमुख अशी ही संकल्पना आहे. या १ हजार मतदारांच्या नावांची मतदार यादीत साधारण २५ पाने होतात. या प्रत्येक पानाला प्रमुख आहे. हजारी पन्नाप्रमुख हा त्यांचा प्रमुख. त्याला बूथ प्रमुख असेही म्हणतात. अशा ५ ते ६ हजारी पन्नाप्रमुखांचा एक शक्तीकेंद्र प्रमुख.
या हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांची एक महाबैठक ९ फेब्रुवारीला गणेश कला क्रिडा मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. पन्नाप्रमुख, हजारी पन्ना प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांनी काय कामे करायची, कशी करायची हे त्यांना नेमून दिलेले आहे. म्हणजे २५ मतदारांची जबाबदारी असलेल्या पन्नाप्रमुखाने या २५ मतदारांच्या थेट घरांच्या संपर्कात रहायचे. कुटुंबातील मतदार असलेल्या सदस्यांबरोबर संवाद साधत रहायचे. त्याला भाजपाची ध्येयधोरणे समजावून सांगायची. भाजपाला मतदार करणे त्यांच्या, देशाच्या समाजाच्या कसे हिताचे आहे ते सांगणे, त्यांच्या मनावर ठसवणे हे काम त्यांनी करायचे आहे. 
शक्तीकेंद्र प्रमुखाने त्याच्या अखत्यारीत असलेल्या बूथप्रमुख म्हणजे हजारी पन्नाप्रमुखाच्या कामावर लक्ष ठेवायचे आहे. हजारी पन्नाप्रमुख त्यांच्या बूथ प्रमुखाच्या कामावर लक्ष ठेवतील. शक्तीकेंद्र प्रमुखाने हजारी पन्नाप्रमुखाच्या कामाचा सातत्याने आढावा घ्यायचा आहे. तो तोंडी असेल लेखी असेल, पण त्याने काम केले आहे किंवा नाही, त्याच्या कार्यक्षेत्रातील मतदार कुटुंबांबरोबर त्याचा संपर्क झाला आहे किंवा नाही याची चाचणीही त्याने घ्यायची आहे. या सर्वांनी मिळून त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील मतदार सदस्यांचे मतदानाच्या दिवशी सकाळी साधारण साडेअकरापर्यंत, म्हणजे पहिल्या टप्प्यातच मतदान घडवून आणायचे आहे.
ही सर्व यंत्रणा कार्यरत झाली आहे. महापालिका निवडणूकीत शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या यंत्रणेचा अत्यंत योग्य वापर केला. त्यामुळेच पक्षातच असलेल्या नगरसेवकांबरोबरच पक्षात बाहेरून ऐन निवडणूकीच्या तोंडावर आलेल्या उमेदवारांनाही नव्याने नगरसेवक होता आले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपाने तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले. आता पुन्हा एकदा ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यात असणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत केलेले काम व यापुढे करायेच काम याची माहिती देण्यासाठी म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष शहा येत आहेत. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हे शिबिर सुरू राहील. शिरूर व बारामतीमधील फक्त हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांनाच बोलावले असून पुण्यातील मात्र बूथप्रमुखापासून हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुख यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 
------------------------
शिरूर लोकसभा मतदार संघ गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेकडे आहे. तरीही या लोकसभा मतदारसंघातील हजारी पन्नाप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांना या महाबैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. 

Web Title: Amit Shah's 'Kanamantra' of victory for BJP's pannapramukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.