पुण्यात होत असलेल्या शिवसृष्टीसाठी गुजरात सरकारकडून ५ कोटींची देणगी

By श्रीकिशन काळे | Published: December 28, 2023 03:24 PM2023-12-28T15:24:03+5:302023-12-28T15:25:05+5:30

पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून ५ कोटी रुपयांची देणगी गुरूवारी सुपूर्त करण्यात आली... (Shivsrushti Historical theme park Pune)

5 Crores Donation from Gujarat Government for Shivsrushti Historical theme park Pune | पुण्यात होत असलेल्या शिवसृष्टीसाठी गुजरात सरकारकडून ५ कोटींची देणगी

पुण्यात होत असलेल्या शिवसृष्टीसाठी गुजरात सरकारकडून ५ कोटींची देणगी

पुणे : पुण्यात होत असलेल्या शिवसृष्टीसाठी थेट गुजरात सरकारकडून ५ कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे. ही देणगी नुकतीच शिवसृष्टी विश्वस्तांना देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसृष्टीचे काम वेगाने होणार आहे.

पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून ५ कोटी रुपयांची देणगी गुरूवारी सुपूर्त करण्यात आली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली. गुजराथ राज्याचे वन व पर्यटन मंत्री मुलु बेरा, पर्यटन सचिव सौरभ पारधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

विनीत कुबेर म्हणाले, “शिवसृष्टीच्या रुपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ५ कोटी रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आला. यावेळी पटेल यांना शिवसृष्टीची संपूर्ण माहिती देत या ठिकाणी त्यांनी नक्की भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आले.”

या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी करण्यात येणार असून यामध्ये प्रतापगडावरील भवानीमाता मंदिराबरोबरच रंगमंडल, गंगासागर तसेच गेल्या ३५० वर्षात शिवछत्रपतींच्या कल्पनेतील स्वराज्य संकल्पनेच्या दिशेने झालेली वाटचाल, मंदिरांचा जीर्णोध्दार, स्वभाषा, स्वधर्म या विषयात पुढील पिढ्यांनी केलेले कार्य याची माहिती देणारे दालन यांचा समावेश असेल. याबरोबरच छत्रपतींच्या राजसभेची निर्मिती पूर्ण करण्याचाही प्रतिष्ठानचा प्रयत्न राहील, अशी माहिती देखील कुबेर यांनी दिली.

Web Title: 5 Crores Donation from Gujarat Government for Shivsrushti Historical theme park Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.